गवंडी कुटुंबीयांना विविध स्तरातून मदत
By Admin | Updated: May 8, 2016 23:02 IST2016-05-08T23:00:52+5:302016-05-08T23:02:49+5:30
येवला : आगीत घराबरोबर साहित्य भस्मसात

गवंडी कुटुंबीयांना विविध स्तरातून मदत
येवला : तालुक्यातील जऊळके येथील कारभारी गवंडी यांच्या राहत्या झापाला आग लागून संसारोपयोगी तसेच मंडप साहित्य जळून खाक झाल्याने गवंडी कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. त्यांच्या या संकटसमयी सामाजिक दायित्व असलेले हात मदतीसाठी पुढे येत आहेत.
कोणी रोख स्वरूपात पैशाची मदत, तर कोणी वस्तू रूपाने मदत करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते राजू पगार यांनी घर बांधणीच्या भिंतीसाठी लागणारे जवळपास १७ ते १८ हजार रुपयांचे सीमेंट ब्लॉक देण्याचे कबूल केले आहे. गवंडी कुटुंब हे आपला संसार नव्याने उभा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देणाऱ्याचे हात हजार असतात याचा पुन: प्रत्यय गवंडी कुटुंबीयांना आला.
गवंडी कुटुंबीय येवल्यातील एच.पी. गॅस एजन्सी येथे नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी आले. गॅस कनेक्शनबाबत सर्व पूर्तता झाल्यानंतर एजन्सीचे व्यवस्थापक यांना गवंडी कुटुंबीयांनी त्यांची परिस्थिती सांगून सवलतीची मागणी केली. दरम्यान, गॅस एजन्सीचे मालक सुरज पटणी यांनी गवंडी कुटुंबीयांकडून एक रुपयाही न घेता संपूर्ण गॅस कनेक्शन विनामूल्य देऊ केले. अशी मदत विविध स्तरातून या कुटुंबीयांना मिळत असून, राखरांगोळी झालेला सारा संसार उभा करण्यासाठी समाजाचे अनेक हात मदतीच्या रूपाने पुढे येत आहेत. (वार्ताहर)