शासनाची हमीभावाने येवल्यात तूर खरेदी वेगात
By Admin | Updated: March 5, 2017 00:48 IST2017-03-05T00:46:29+5:302017-03-05T00:48:44+5:30
येवला : नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्या वतीने येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ येथे ५०५० रुपये प्रतिक्विंटल स्थिर भावाने तूर खरेदी सुरू करून महिना झाला

शासनाची हमीभावाने येवल्यात तूर खरेदी वेगात
येवला : नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्या वतीने येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ येथे ५०५० रुपये प्रतिक्विंटल स्थिर भावाने तूर खरेदी सुरू करून महिना झाला. गेल्या महिनाभरात ५०५० रु पये प्रतिक्विंटल दराने १२५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपली तूर स्वच्छ करून वाळवून तसेच सोबत सातबारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबूक झेरॉक्स आणण्याचे आवाहन खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र गायकवाड, व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी केले आहे.
यंदा पुरेसा पाऊस आणि अनुकूल हवामान असल्याने तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने तुरीचे भाव कोसळले होते. शासनाने ५०५० रुपये हमीभाव जाहीर केला होता. तरीदेखील कमी दराने तूर विकावी लागल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते. गेल्या वर्षी कमी उत्पादन असल्याने पहिल्या टप्प्यात १३ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने तूर विकली गेली. त्यानंतर ९५०० रुपयापर्यंत तुरीचे भाव स्थिर झाले होते. यंदा मात्र खुल्या बाजारपेठेत चार हजार पाचशे रुपयापर्यंत तुरीचे भाव कोसळले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरीला निम्म्यापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी निराश झाला होता. यावर मलमपट्टी म्हणून फेअर अॅव्हरेज क्वॉलिटीच्या नियमानुसार १२ टक्के आर्द्रता, धान्याचे ग्रेडिंग, कचराविरहित तूर अशा कसोटीतून जाऊन शेतकऱ्यांच्या तुरीला ५०५० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचे धोरण सुरू करण्यात आले. (वार्ताहर)