सेवाभावी संस्थांचा हातभार
By Admin | Updated: September 29, 2015 00:27 IST2015-09-29T00:27:18+5:302015-09-29T00:27:41+5:30
हजारो मूर्ती संकलित : नाशिककरांचा उत्स्फू र्त प्रतिसाद

सेवाभावी संस्थांचा हातभार
नाशिक : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाला शहरातील विविध सामाजिक व पर्यावरणप्रेमी संघटनांनी मूर्ती संकलन करत हातभार लावला. त्यामुळे मूर्ती संकलनाच्या आकडेवारीने उच्चांक गाठला आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव नाशिककरांनी साजरा करत गोदावरी नदीचे होणारे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न केला.
आपलं पर्यावरण ग्रुपने तपोवन गोदावरी-कपिला संगमावर सुमारे सहा हजार मूर्तींचे संकलन केले. ७० स्वयंसेवकाने परिश्रम केले. दोन टन निर्माल्याचे संकलन केले. या संस्थेचे मूर्ती संकलनाचे सातवे वर्ष होते. संकलित झालेल्या मूर्ती संस्थेकडून विविध मूर्तिकारांना मोफत देण्यात आल्या. जेणेकरून या मुर्तींवर पुन्हा रंगकाम करून पुढील वर्षी विक्रीसाठी त्या बाजारात आणता येतील व नव्याने प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या आगमनाला आळा बसेल यासाठी ‘पुनर्वापर’ही संकल्पना आपलं पर्यावरण ग्रुपने सुरू केल्याचे शेखर गायकवाड यांनी सांगितले. सकाळपासून सुमारे ८० स्वयंसेवक या तपोवन केंद्रावर मूर्ती व निर्माल्य संकलनासाठी प्रयत्नशील होते. या ग्रुपने स्वखर्चाने निर्माल्य व मूर्तींची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती.
विद्यार्थी कृती समितीच्या ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्र मास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोदापार्क येथे शहरातील सुमारे ११ हजार ४३३ भाविकांनी गणेशमूर्ती दान केल्याची माहिती अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली. विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. गणेशोत्सव मंडळांसह नागरिकांच्या घरोघरी जाऊन समितीच्या वतीने जनजागृती करणारे माहिती पत्रकांचे वाटप केले. विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच समितीचे सुमारे २०० कार्यकर्ते मूर्ती संकलनासाठी प्रयत्नशील होते.
सामाजिक वनीकरणाच्या वतीने रोपवाटिका पुलालगत निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रावर सात ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन करण्यात आले असून, यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जाणार आहे. या खताचा वापर रोपवाटिके त रोपनिर्मितीसाठी केला जाणार असल्याचे उपसंचालक बी. के. पडवळ यांनी सांगितले.
क. का. वाघ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नपूर्ती फाउण्डेशनच्या वतीने रामकुंड, तपोवन, रामघाट या तीन ठिकाणी मूर्ती संकलन केले. तीनही ठिकाणांचे मिळून सुमारे तेरा हजार मूर्ती संकलित करण्यात आल्या. (प्रतिनिधी)