हेल्मेटची सक्ती चोरट्यांच्या पथ्यावर?
By Admin | Updated: October 27, 2015 22:46 IST2015-10-27T22:45:13+5:302015-10-27T22:46:01+5:30
पोलिसांपुढे पेच : सोनसाखळी चोरीच्या वाढणार घटना

हेल्मेटची सक्ती चोरट्यांच्या पथ्यावर?
इंदिरानगर : जीविताच्या रक्षणासाठी हेल्मेट व सीट बेल्ट अत्यावश्यक असून, आरटीओ व पोलीस विभागाने सोमवारपासून कडक कारवाई सुरू केली आहे़ दुचाकीधारकांसाठी जीवदान ठरणारे हेल्मेट आवश्यक असले तरी, ही हेल्मेटसक्ती सोनसाखळी चोरट्यांच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे़ एरवी धूम स्टाईलने फरार होणाऱ्या चोरट्यांना ओळखणे कठीण असताना त्यात ते हेल्मेटधारी असतील, तर विचारायलाच नको, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे़
शहरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यामध्ये खून, घरफोडी, तोतया पोलीस, रिक्षाद्वारे अपहरण करून लूट, खून, विनयभंग यांबरोबरच सोनसाखळी खेचून नेल्याच्या घटनांचा समावेश आहे़ या गुन्ह्यांना अटकाव करण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे़ त्यातच प्रादेशिक परिवहन विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची उपरती झाली असून, त्यादृष्टीने त्यांनी दुचाकीधारकांना हेल्मेट, तर चारचाकीधारकांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक केले आहे़
सोमवारपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आरटीओ व पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करण्यास प्रारंभ केला असून, दिवाळीपूर्वीच वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे़ जीविताच्या रक्षणासाठी या नियमांचे पालन करणे गरजेचे असले तरी हेल्मेट घालून सोनसाखळी चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यातच या चोरट्यांच्या दुचाकीवरील क्रमांकही खरा असेलच असे सांगता येत नाही़ त्यामुळे ही सक्ती चोरट्यांच्या पथ्यावर पडणार, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे़