हेल्मेटची सक्ती गुन्हेगारांच्या पथ्यावर
By Admin | Updated: February 12, 2016 23:33 IST2016-02-12T23:32:41+5:302016-02-12T23:33:00+5:30
धूमस्टाइल : फरार होणाऱ्या चोरट्यांना ओळखणे कठीण

हेल्मेटची सक्ती गुन्हेगारांच्या पथ्यावर
इंदिरानगर : जीविताच्या रक्षणासाठी हेल्मेट व सीट बेल्ट अत्यावश्यक असून, शहरात येत्या काही दिवसांत न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे़ दुचाकीधारकांसाठी हेल्मेट जीवदान देणारे असले तरी, ही हेल्मेट सक्ती सोनसाखळी चोरटे व गुन्हेगारांच्या पथ्यावर पडणार आहे़़ एरवी धूम स्टाइलने फरार होणाऱ्या चोरट्यांना ओळखणे कठीण असताना त्यात ते हेल्मेटधारी असतील, तर विचारायलाच नको़ दरम्यान, ही सक्ती केवळ महामार्गावरच करण्याची मागणी केली जाते आहे़
शहरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असून, त्यामध्ये खून, घरफोडी, तोतया पोलीस, रिक्षाद्वारे अपहरण करून लूट, खून, विनयभंग यांबरोबरच सोनसाखळी खेचून नेल्याच्या घटनांचा समावेश आहे़ या गुन्ह्यांना अटकाव करण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे़ शहरात न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी केली जाणार असून, त्यादृष्टीने दुचाकीचालकांना हेल्मेट, तर चारचाकीधारकांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक केले जाणार आहे़
न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता पूर्ण होण्यासाठी दुचाकी वाहन उत्पादकांमार्फत त्यांच्या राज्यातील सर्व वाहन विक्रेत्यांनी दुचाकी वाहन विकतेवेळी खरेदीदारास दोन हेल्मेट््स पुरविण्याबाबत निर्देशित केले आहे.
या चोरट्यांच्या दुचाकीवरील क्रमांकही खरा असेलच असे सांगता येत नाही़ त्यामुळे ही सक्ती चोरट्यांच्या पथ्यावर पडणार, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे़ (वार्ताहर)