उद्यापासून हेल्मेट सक्ती

By Admin | Updated: October 24, 2015 23:53 IST2015-10-24T23:52:44+5:302015-10-24T23:53:35+5:30

आरटीओची मोहीम : सीट बेल्ट न लावणाऱ्यांवरही होणार कारवाई

Helmet forced from tomorrow | उद्यापासून हेल्मेट सक्ती

उद्यापासून हेल्मेट सक्ती

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे़ या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सोमवार (दि़२६) पासून शहरात वाहनांची तपासणी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे़ या तपासणी मोहिमेत हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार असून, दोषी वाहनचालकांचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे़
रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार सिग्नलचे उल्लंघन करणे, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, तसेच हेल्मेट व सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने प्रादेशिक परिवहन विभागाला दिले आहेत. याबरोबरच मद्य वा अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करून तुरुंगवासाची शिक्षा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
वाहन तपासणीत दोषी आढळणारे व वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या दोन तासांच्या समुपदेशनासाठी उपस्थित रहावे लागणार आहे़ यानंतरच तडजोड शुल्क किंवा न्यायालयीन कारवाई पूर्ण करून प्रकरण निकाली काढले जाणार आहे़ आरटीओ विभागाने वाहतूक नियमांचे पालन करण्याची सुरुवात आपल्या कार्यालयापासून केली आहे़ गत पंधरा दिवसांपाूसन कार्यालयात सीट बेल्ट, हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात येत आहे़
आरटीओ विभागाच्या वतीने वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज संस्था, विविध कंपन्यांचे कार्यालयीन प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. नाशिक शहरातील रस्त्यांवरील वाहनांची तपासणी मोहीम प्रादेशिक परिवहन विभाग सोमवार (दि. २६) पासून हाती घेणार असल्याचे कळसकर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोहीम...

दुचाकी व चारचाकी वाहनचालकांनी हेल्मेट व सीट बेल्ट वापरणे हे त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहे़ या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे़ याबरोबरच दुचाकी वाहनचालकाच्या पाठीमागे बसणाऱ्याने हेल्मेट, तर चारचाकी वाहनाच्या पाठीमागील सीटवर बसणाऱ्यांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक आहे़

Web Title: Helmet forced from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.