बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी
By Admin | Updated: July 31, 2016 01:13 IST2016-07-31T01:12:30+5:302016-07-31T01:13:30+5:30
अशोक चव्हाण : कांदा प्रश्न, शिर्डी संस्थान नियुक्तीवर टीका

बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी
नाशिक : गेल्या दोन आठवड्यांपासून बंद असलेल्या कांदा लिलावामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. कांदा उत्पादकांना सरकारने नुकसानभरपाई दिली पाहिजे. भ्रष्ट मंत्र्यांचे पुरावे देऊनही बहुमताच्या जोरावर विधानसभेत कामकाज रेटून नेले जात आहे. सरकारला जनतेशी काहीही घेणे-देणे राहिलेले नाही. जनतेच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या विरोधी पक्षांची मुस्कटदाबी लोकसभेत आणि विधानसभेत भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.
कोणतीही पर्यायी व्यवस्था नसताना बाजार समितीच्या नियमन मुक्तीचा निर्णय घेतल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत आवाज उठवूनही त्यावर सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. कांदा लिलाव न झाल्याने कांदा उत्पादकांना सरकारने तत्काळ नुकसानभरपाई दिली पाहिजे. तसेच तत्काळ कांदा लिलाव सुरू केले पाहिजेत. सर्वसामान्यांना महाग असलेली तूरडाळ मात्र महागड्या मॉलमध्ये स्वस्त करण्याकडे सरकारचा कल आहे. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये कधीच कांदा प्रश्न काय किंवा अन्य सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कधीही चर्चा नसते, असेही चव्हाण म्हणाले. भ्रष्ट मंत्र्यांचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री बघू, करू, अशी भाषा वापरत आहे. बहुमताच्या जोरावर कामकाज रेटून नेण्याचा त्यांचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकला आगामी महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी बैठका घेत आहे. यापूर्वी नागपूर, औरंगाबाद, पुणे, ठाणे येथेही अशाच प्रकारे कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्राथमिक चर्चा करून संवाद साधत आहे. आगामी निवडणुकांमध्ये तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. कॉँग्रेसमध्ये मरगळ आलेली नाही, उलट आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीशी युती नको, असे सांगितले आहे. असेच संमिश्र वातावरण अन्य जिल्ह्णात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीशी आघाडीचा प्रदेश पातळीवरून नव्हे तर जिल्हा पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देणार आहोत. यावेळी माजीमंत्री रोहिदास पाटील, प्रभारी उल्हास पाटील, डी. जी. पाटील, के. सी. पाडवी, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जयप्रकाश छाजेड, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, प्रसाद हिरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)