ढगाळ, उष्ण वातावरणामुळे शेतकरी हवालदिल
By Admin | Updated: April 2, 2017 00:46 IST2017-04-02T00:46:09+5:302017-04-02T00:46:19+5:30
खामखेडा : गेल्या आठ दिवसांपासून तपमानात वाढ झाल्याने व अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने उन्हाळी कांदा कसा वाचवावा म्हणून शेतकरी चिंतातुर झाला आहे.

ढगाळ, उष्ण वातावरणामुळे शेतकरी हवालदिल
खामखेडा : गेल्या आठ दिवसांपासून तपमानात वाढ झाल्याने व अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने उन्हाळी कांदा शेतात काढून ठेवला. उन्हाळी कांदा कसा वाचवावा म्हणून शेतकरी चिंतातुर झाला आहे.
उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम हा एप्रिल महिन्यात असतो. त्यामुळे सध्या कसमादे परिसरात उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतात सर्वत्र उन्हाळी कांद्याच्या वळी दिसून येत आहेत. कसमादे परिसरात उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते.
गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी या परिसरात डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्यामुळे त्यावेळी डाळींब या पिकाकडे हमखास पैसे मिळवून देणारे नगदे पीक म्हणून पाहिले जात असे. त्यावेळी उन्हाळी कांद्याचे पीक अल्प प्रमाणात घेतले जात होते. त्यामुळे कांद्याला भावही चांगला मिळत होता. परंतु गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी डाळींब पिकावर तेल्या रोगाने तैमान घातल्याने डाळिंबाची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी डाळींब पिकाकाडे वळल्याने उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात वाढ
झाली.
सध्या पाऊस येण्यासारखे वातावरण तयार झाले आहे. जर यावेळी पाऊस आला तर शेतातील कांदा काढून कांद्याच्या पातीने झाकून ठेवलेला कांदा पावसाने भिजला तर तो शेतातच खराब होईल की काय, याची भीती शेतकऱ्याला वाटत आहे. या ढगाळ वातावरणामुळे अचानक पाऊस आला तर कांदे झाकण्यासाठी कोणाकडे ताडपत्री किंवा प्लॅस्टिक कागद मिळतो का? याची
चौकशी शेतकरी करीत आहे. आता काही शेतकरी चाळीत कांदा साठवणूक करीत आहेत. (वार्ताहर)