ठाणगाव येथे भीषण पाणीटंचाई
By Admin | Updated: April 12, 2016 22:55 IST2016-04-12T22:52:02+5:302016-04-12T22:55:31+5:30
ठाणगाव येथे भीषण पाणीटंचाई

ठाणगाव येथे भीषण पाणीटंचाई
पाटोदा : येवल्यापासून १३ किमी अंतरावर असलेल्या आणि कधीकाळी संपूर्ण येवला तालुक्याला टँकरने पाणी पुरविणाऱ्या ठाणगाव आणि परिसरावर उन्हाच्या तीव्र झळांबरोबरच भीषण पाणीटंचाईच्या समस्येचे संकट गंभीर बनत असल्याने येथील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. पाण्यासाठी सर्वच ग्रामस्थांना चोवीस तास आॅन ड्यूटीवर रहावे लागत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, ठाणगावकरांवरच कुणी पाणी देत का पाणी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
ठाणगावला सध्या पाटोदा येथील पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र सततच्या दुष्काळामुळे येथे डिसेंबर - जानेवारी-पासूनच पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. पाणीपुरवठा करणारी विहीर फक्त ८/१० फूटच खोल असल्याने पाणी साठा होत नाही.
शासनाने नुकतीच नवीन पाइपलाइन व विहिरीची खोदाई करण्याकामी सुमारे ५५ लाखांच्या नवीन योजनेला मंजुरी दिली
आहे. त्यातील पाइपलाइनचे कामदेखील पूर्ण झाले आहे. पाण्याचा साठा वाढविण्यासाठी विहीर
खोल करणे गरजेचे आहे. सन १९८९ ते १९९४ या कालावधीत तालुक्यातील सर्वच टंचाईग्रस्त गावांना पंचायत समिती ठाणगाव येथून पाणीपुरवठा करीत असे. संपूर्ण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणगावलाच पाणी पाणी करावे लागत आहे.
पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्याने महिला, पुरुष व लहान मुले अबालवृद्ध सकाळपासून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणताना दिसत
आहेत. हंडाभर पाण्यासाठी कोसो मैल भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थ बैलगाडी, सायकल, मोटारसाकल या वाहनांचा पाणी आणण्यासाठी वापर करीत
आहेत. पाण्यासाठी रात्री, पहाटे व दिवसभर पायपीट करावी लागत असल्याने दैनंदिन जीवनावर याचा विपरीत परिणाम होत आहे.
(वार्ताहर)