शहरात पावसाची जोर‘धार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:11 IST2021-06-29T04:11:49+5:302021-06-29T04:11:49+5:30
शहर व परिसरात मागील दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पुनरागमन केले. रविवारप्रमाणेच सोमवारीही संध्याकाळी पावसाने चांगली हजेरी लावली. ...

शहरात पावसाची जोर‘धार’
शहर व परिसरात मागील दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पुनरागमन केले. रविवारप्रमाणेच सोमवारीही संध्याकाळी पावसाने चांगली हजेरी लावली. ठिकठिकाणी उंचसखल भागात पावसाचे पाणी साचले होते. सुमारे तासभर मध्यम व हलक्या सरींचा वर्षाव सुरू होता.
जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची शक्यता कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता; मात्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाला सुरुवात झाली आहे. शहरात दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारच्या सुमारास अधूनमधून ढग दाटून येत होते. कमाल तापमान ३०.५ अंश इतके नोंदविले गेले. संध्याकाळी साडेसहा वाजेनंतर शहरात पावसाचे वातावरण तयार होऊन दमदार सरींच्या वर्षाव होऊ लागल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम शहरासह उपनगरांमध्येही सुरूच होती.
--इन्फो---
बळीराजाच्या आशा पल्लवित
आठवडाभरापूर्वी शनिवारी (दि. १९) शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. रात्री ११ वाजेपर्यंत शहरात २६.६ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली होती. मात्र रविवारपासून पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पुन्हा हवालदिल झाला होता; मात्र आठवडाभरानंतर पुन्हा सरींचा वर्षाव झाल्याने जिल्ह्यातील बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.