मुसळधार पावसाने शहर परिसराला झोडपले
By Admin | Updated: June 4, 2017 03:00 IST2017-06-04T03:00:10+5:302017-06-04T03:00:24+5:30
नाशिक : मान्सूनपूर्व पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्याला शनिवारी (दि.३) दुपारी जोरदार तडाखा दिला

मुसळधार पावसाने शहर परिसराला झोडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मान्सूनपूर्व पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्याला शनिवारी (दि.३) दुपारी जोरदार तडाखा दिला. ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह गारपिटीने शहरासह आजूबाजूच्या गावांनाही झोडपले. बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात दुपारी वीज कोसळल्याची घटना घडली. दरम्यान, शहरासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली, तसेच अग्निशमन दलाची धावपळ झाली.
वातावरणात मान्सूनपूर्व अस्थिरता निर्माण झाल्यामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शहरात हजेरी लावली. पहिल्याच पावसात महापालिकेचे पितळ उघडे पडले. महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापासून तर थेट जुना गंगापूर नाका सिग्नलवरील परिसरातही पाण्याचे तलाव साचल्याने महापालिका नापास झाली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास ढगांचा गडगडाट अन् वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या मुसळधार पावसाने शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले होते. तसेच सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे कॉलेजरोड, गंगापूररोड, पंचवटी, द्वारका, काठेगल्ली, सातपूर, सिडको, नाशिकरोड परिसरात ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वाहने तसेच सोसायट्यांच्या आवारातील वाहने झाडांखाली दबली गेली.