शहरात होलिकोत्सवाची जोरदार तयारी

By Admin | Updated: March 12, 2017 01:05 IST2017-03-12T01:04:56+5:302017-03-12T01:05:07+5:30

नाशिक : फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव हुताशनी पौर्णिमा. गवऱ्या, लाकडे, हारकडे, फुले आदिंची आरास करून रविवारी (दि.१२) गल्लोगल्ली लहान-मोठ्या होळ्या पेटणार आहेत.

Heavy festive preparations in the city | शहरात होलिकोत्सवाची जोरदार तयारी

शहरात होलिकोत्सवाची जोरदार तयारी

नाशिक : फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव हुताशनी पौर्णिमा. गवऱ्या, लाकडे, हारकडे, फुले आदिंची आरास करून रविवारी (दि.१२) गल्लोगल्ली लहान-मोठ्या होळ्या पेटणार आहेत. त्यासाठी नैवेद्य, साग्रसंगीत पूजा आदिंची तयारी झाली आहे.
आज शहरीकरणामुळे आणि टीव्ही, मोबाइल, गेम यात मुलं मग्न असल्याने होळीसारखे सण उत्स्फूर्त सहभागाने साजरे होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी थोड्या प्रमाणात मुलं गोवऱ्या, लाकडं गोळा करणे, अल्पशी वर्गणी गोळा करून होळीची तयारी करण्याचे काम करत आहेत. महिलांनीही पुरणपोळीसह नैवेद्याचा वैविध्यपूर्ण मेनू ठरविला असून, त्याची तयारी घरोघरी दिसून आली. डाळींचे भाव उतरल्याने यंदाच्या होळीला गोडवा येणार आहे.
होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गंगा घाटावर गर्दी केली होती. गंगाघाटावरील गौरी पटांगणावर आदिवासी पाड्यातून मोठ्या प्रमाणात रानशेणी तसेच थापलेल्या गोवऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. पेठ तालुक्यातील हरसूल, कुळवंडी, आड तसेच अन्य जवळच्या आदिवासी वस्तीतील गोवऱ्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत. गौरी पटांगणावर गोवऱ्या दाखल झाल्याने होळी साजऱ्या करणाऱ्या मित्रमंडळांच्या कार्यकर्त्यांनी गोवऱ्या खरेदी करण्याचे काम सुरू केले आहे.
समाजातील अनिष्ठ रुढी, परंपरा नष्ट होऊन चांगल्या गोष्टी समोर याव्यात यासाठी साजऱ्या होणाऱ्या होळी दरम्यान निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचा सूर संवेदनशील नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. होळीसाठी निष्कारण मोठमोठी झाडे, फांद्या तोडल्या जाऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. पर्यावरणवादी संघटना यासाठी जनजागृतीचे काम करत आहे.

Web Title: Heavy festive preparations in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.