मूर्तीदानाने बाप्पाला भावपूर्ण निरोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:11+5:302021-09-21T04:16:11+5:30

नाशिक : ना ढोल, ना ताशा, ना भव्य मिरवणूक, ना पूर्वीचा जल्लोष. मात्र, गणरायाला निरोप देताना प्रत्येक कुटुंबाला आणि ...

A heartfelt message to Bappa through idol donation! | मूर्तीदानाने बाप्पाला भावपूर्ण निरोप !

मूर्तीदानाने बाप्पाला भावपूर्ण निरोप !

नाशिक : ना ढोल, ना ताशा, ना भव्य मिरवणूक, ना पूर्वीचा जल्लोष. मात्र, गणरायाला निरोप देताना प्रत्येक कुटुंबाला आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना भावना दाटून आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्तासह अधिकाधिक नागरिकांनी मूर्तीदानाला प्राधान्य दिल्याने यंदाचा गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक झाला. बहुतांश नागरिकांनी काठावर साग्रसंगीत आरती करून ’कोरोनाचे विघ्न सरू दे’ असेच साकडे घातले तसेच गणरायाच्या मूर्तीला गोदेच्या पाण्यात तीनवेळा विसर्जनाची प्रातिनिधिक क्रिया करीत गोदाकाठावरील मूर्ती संकलन केंद्रांवर मूर्ती दान करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

‘कोरोनाचे विघ्न कायमचे संपवून पुढच्या वर्षी लवकर या', असेच मागणे मागत भाविकांनी गणपती बाप्पा मोरया या जयजयकारात गणरायाला भावूकतेने निरोप दिला. गोदाकाठावरील मूर्ती संकलन केंद्रांवर लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या भावना उचंबळून आल्या होत्या. रविवारी मूर्तीच्या उत्तर पूजनासाठी घरांमध्ये व सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये सकाळपासूनच लगबग दिसून येत होती. त्यानंतर दुपारचा नैवेद्य दाखवून दहा दिवसांच्या गणरायांच्या विसर्जनासाठी नागरिकांनी गोदाकाठावर जमण्यास प्रारंभ केला. यंदा मूर्ती विसर्जनास परवानगी नसल्याने मूर्ती संकलनासाठी विविध सामाजिक सेवा संस्था आणि महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात व्यवस्था ठेवण्यात आली होती. दुपारी एकनंतर गोदाकाठावर केंद्रांवर मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रामकुंड ते गाडगेमहाराज पूल, रोकडोबा ते थेट कन्नमवार पुलापर्यंतचा गोदाकाठ, दसक, पंचक, विहीतगाव आदी परिसरात मूर्ती संकलन केंद्रांसोबतच पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यामुळे या ठिकाणीदेखील नागरिकांनी मूर्तीदानाला प्राधान्य दिले. निर्माल्य विसर्जनासाठीही मनपा, प्रारब्ध तसेच अन्य सामाजिक संस्थांनी स्वतंत्र व्यवस्था केली होती. त्यामुळे तिथेदेखील मोठ्या प्रमाणात मूर्तीदान करण्यात आले. तर अनेक भाविकांनी घरातील लहान शाडू मातीच्या मूर्तींचे घरातील बादलीत विसर्जन करीत पर्यावरणपूरक विसर्जनात योगदान दिले. शहरात बहुतांश नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन केले असले तरी गोदापात्रावर विसर्जनासाठी आलेल्या अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांना मात्र मास्क तसेच सुरक्षित अंतराचा विसर पडल्याचे दिसून आले.

इन्फो

मोठ्या सोसायट्यांमध्ये टँक ऑन व्हील

महापालिकेच्या वतीने मूर्ती विसर्जनासाठी ‘टँक ऑन व्हील’ ही संकल्पनाही शहरातील विविध भागांमधील सोसायट्यांमध्ये राबविण्यात आली. सोसायट्यांमधील विविध बिल्डिंगमधील सदस्यांनी एकत्रित येत या टँकमध्ये मूर्ती विसर्जित केल्या. काही प्रमाणात कमी झालेली सार्वजनिक मंडळे यामुळे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी कमी असली तरी कुटुंबातील नागरिकांच्या गर्दीचे प्रमाण कायम होते.

इन्फो

रामकुंडापासून थेट गाडगेमहाराज पुलापर्यंत दुपारपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्या गर्दीत कोणतीही घट आलेली नव्हती. शहरातील दसक, पंचक, सोमेश्वर परिसर,पंचवटी परिसरात तपोवन व गोदाकाठी भाविकांची दुपारनंतर गर्दी तुफान वाढली. सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे नियमाचे पालन भाविकांकडून केले जात नसल्याने पोलिसांनी सातत्याने सूचना देऊन गर्दीवर वॉच ठेवला. धोकादायक ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, यासाठीदेखील सुरक्षा यंत्रणेकडून वारंवार आवाहन करण्यात येत होते. विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा सज्ज होता. स्थानिक पोलीस स्टेशनचे पुरुष व महिला कर्मचारी, वाहतूक पोलीस, अधिकारी यांसह राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाचे जवान विसर्जनस्थळी तैनात होते. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी एक अपघात वगळता पूर्ण विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.

Web Title: A heartfelt message to Bappa through idol donation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.