निलंबित सदस्य प्रकरणात आज सुनावणी
By Admin | Updated: March 29, 2017 00:37 IST2017-03-29T00:36:51+5:302017-03-29T00:37:06+5:30
नाशिक : गैरव्यवहार व अनियमिततेच्या आरोपात निलंबनानंतर मिलिंद जहागीरदार यांच्यासह तिन्ही सदस्यांनी दिवाणी न्यायालय व धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या याचिकेची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.

निलंबित सदस्य प्रकरणात आज सुनावणी
सावाना गैरव्यवहार प्रकरण : धर्मादाय आयुक्त, दिवाणी न्यायालयाच्या निकालाकडे नाशिककरांचे लक्ष
नाशिक : सार्वजनिक वाचनालयात गैरव्यवहार व अनियमिततेच्या आरोपात निलंबनानंतर मिलिंद जहागीरदार यांच्यासह तिन्ही सदस्यांनी दिवाणी न्यायालय व धर्मादाय आयुक्तांकडे निलंबन मागे घेण्यासाठी केलेल्या याचिकेची सुनावणी अंतिम टप्प्यात असून, बुधवारी (दि.२९) या प्रकरणाचा निकाल येणाची शक्यता आहे. या निकालानंतर निलंबित तिन्ही सदस्यांना सावानाच्या निवडणुकीत मतदान करता येणार किंवा नाही याकडेही नाशिककरांचे लक्ष आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या नूतनीकरणाच्या आणि सुशोभीकरणाच्या कामात अनियमितता व गैरव्यवहाराच्या आरोपात सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्याकडून तत्कालीन कार्यवाह मिलिंद जहागीरदार, कार्याध्यक्ष विनया केळकर व अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांचे निलंबन करण्यात आल्यानंतर सदर निलंबित सदस्यांनी त्यांचे निलंबन रद्द करून त्यांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्याचे निर्देश दिल्याने हे प्रकरण धर्मादाय आयुक्तासमोर सादर करण्यात आले. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांसमोर दोन्ही पक्षांनी त्यांचे म्हणणे मांडले असून, आता दिवाणी न्यायालय व धर्मादाय आयुक्तालयत दाखल असलेल्या दोन्ही याचिकांवर आज अंतिम निकाल येणाची शक्यता असल्याने या निकालाकडे सावानाच्या वाचकवर्गासह संपूर्ण नाशिकरांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, या प्रकरणान न्यायालयात निर्णय प्रलंबित असताना दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप होत असून, जहागिरदार यांनी औरंगाबादकर यांच्यावर सर्वसाधारण सभेत वास्तूविशारद अनिल चोरडिया यांचा अहवाल सोयीने मांडून सभासदांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. (प्रतिनिधी)
सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी गेले सहा महिने वाचनालयात चालविलेला बेकायदेशीर कारभार निव्वळ खोटारडेपणावर आधारलेला आहे. वास्तूविशारद अनिल चोरडिया यांनी कोणतीही शहानिशा न करता एकतर्फीपणे दिलेला अहवालही औरंगाबादकर यांनी सोयीने मांडून वाचक, सभासद आणि नाशिककरांची दिशाभूल केलेली आहे.
- मिलिंद जहागिरदार, निलंबित सदस्य, सावाना
मिलिंद जहागीरदार यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. अनिल चोरडिया यांनी चार अभियंत्यांना सोबत घेऊन बांधकामाचे शास्त्रशुद्धरीत्या परीक्षण व मूल्यांकन केले आहे. त्यांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम पुराव्यांसह अहवाल सादर केला आहे. या अहवालाविषयी जहागीरदार यांच्या मनात कोणतीही साशंकता असल्यास त्यांनी सरकारी मान्यता प्राप्त वास्तुविशारदांकडून बांधकाम आणि अहवालातील अधोरेखित मुद्द्यांची फेरपडताळणी करावी. त्यासाठीही आम्ही तयार आहोत.
- विलास औरंगाबादकर, अध्यक्ष, सावाना