तहसीलदार निलंबन प्रकरणाची सुनावणी लांबली

By Admin | Updated: June 13, 2015 00:07 IST2015-06-13T00:07:30+5:302015-06-13T00:07:30+5:30

सुरगाणा धान्य घोटाळा : सोमवारी होणार सुनावणी

Hearing of Tahsildar suspension case | तहसीलदार निलंबन प्रकरणाची सुनावणी लांबली

तहसीलदार निलंबन प्रकरणाची सुनावणी लांबली

नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळा प्रकरणी शासनाने नेमलेल्या पाच सदस्यीय चौकशी समितीचा अहवाल गुरुवारी सादर केल्यानंतर शुक्रवारी (दि. १२) याबाबत निर्णय होण्याची शक्यता होती; मात्र सरकारी वकील उपस्थित नसल्याने याबाबतची सुनावणी आता सोमवारी (दि. १५) ठेवण्यात आली आहे.
गुरुवारी याबाबत राज्य शासनाच्या वतीने चौकशी समितीचा अहवाल मॅटसमोर सादर करण्यात आला, तसेच अधिकाऱ्यांचाही युक्तिवाद ऐकण्यात आला. राज्य शासनाचा अहवाल सादरकर्ता प्रतिनिधी नसल्याने त्याचे म्हणणे ऐकल्यानंतरच मॅट या प्रकरणी सोेमवारी निर्णय देणार आहे.
सात तहसीलदारांच्या निलंबनाला मॅटमध्ये आव्हान देण्यात आल्याने त्यावर बुधवारी सुनावणी झाली. तहसीलदारांनी अपील दाखल केल्यनांतर मॅटने सरकारला म्हणणे सादर करण्याची सूचना केली. त्यावेळी सरकारने या साऱ्या प्रकरणाची येत्या १५ दिवसांत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रतिज्ञापत्र मॅटसमोर सादर केले होते. त्यावर तहसीलदारांच्या वतीने बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी या चौकशी समितीचा अहवाल मॅटसमोर सादर करण्याची मागणी केली
होती.
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीचाअहवाल गुरुवारी मॅटसमोर सादर करण्यात आला; मात्र अहवाल सादरकर्ता नसल्याने त्याचे म्हणणे शुक्रवारी ऐकून घेतल्यानंतर निर्णय देण्यात येणार होता; मात्र सरकारी वकीलच उपस्थित नसल्याने याबाबतचे कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे सोेमवारी हा युक्तिवाद ऐकल्यानंतरच मॅट निर्णय देणार असल्याने या निकालाकडे निलंबित तहसीलदारांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hearing of Tahsildar suspension case