आरोग्यप्रश्नी प्रशासन धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:27 IST2017-11-01T00:27:13+5:302017-11-01T00:27:20+5:30
महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी आरोग्य व वैद्यकीय प्रश्नी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. अधिकाºयांकडून कामेच केली जाणार नसतील तर प्रभाग समितीच्या सभा घेतातच कशाला, असा संतप्त सवालही सदस्यांनी उपस्थित केला.

आरोग्यप्रश्नी प्रशासन धारेवर
इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी आरोग्य व वैद्यकीय प्रश्नी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. अधिकाºयांकडून कामेच केली जाणार नसतील तर प्रभाग समितीच्या सभा घेतातच कशाला, असा संतप्त सवालही सदस्यांनी उपस्थित केला. पूर्व प्रभाग समितीची सभा सभापती शाहीन मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रभाग ३० मध्ये वडाळागाव येथे मनपाच्या रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे. परंतु, अद्यापही सर्वसामान्यांसाठी ते खुले करण्यात आलेले नाही. रुग्णालय कधी सुरू करणार, असा प्रश्न श्याम बडोदे यांनी केला. आरोग्य सभापतींनी आदेशित करूनही दखल घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. उद्यानातील वाढत्या गाजर गवताकडेही बडोदे यांनी लक्ष वेधले आणि ठेकेदारांना पोसण्याचे काम बंद करा, असा इशारा प्रशासनाला दिला. प्रत्येक प्रभागच्या सभेत सदस्य नागरिकांच्या समस्या मांडतात. परंतु अधिकारीवर्ग जर कामच करत नसेल तर प्रभाग समित्यांच्या सभांना येऊन काय उपयोग, अशी विचारणा डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली. चार्वाक चौकातील राधेय अपार्टमेंटच्या तळघरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असल्याची तक्रारही कुलकर्णी यांनी केली. सदर पाणी काढण्याबाबत मनपाच्या कर्मचाºयांना प्रवेश दिला जात नसल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सूचना कुलकर्णी यांनी केली. शनिमंदिरालगत आणि पेठेनगर रस्त्याजवळ नादुरुस्त वाहने पडून असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची तक्रार करण्यात आली. प्रभाग २३ मधील जॉगिंग ट्रॅक शनिमंदिर व वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेले महादेव मंदिर अनधिकृत ठरविण्यात आले आहे. परंतु, सदर मंदिर हे ५० ते ६० वर्षांपूर्वीचे असल्याचे चंद्रकांत खोडे यांनी निदर्शनास आणून दिले. विवेकानंद सभागृहालगत वाढलेले गाजर गवत काढण्याची सूचनाही खोडे यांनी केली. दरम्यान, विविध विकास कामांच्या २५ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.
कुलकर्णींचा बदललेला सूर
दीड महिन्यापूर्वी झालेल्या महासभेत साथरोगप्रश्नी विरोधकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना भाजपाच्या नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी प्रशासनातील अधिकारी किती चांगले काम करतात आणि फोन केला की पाच मिनिटांतच हजर होतात, अशी कौतुकाची पावती दिली होती. मात्र, दीड महिन्यांतच कुलकर्णी यांचा प्रशासनाबाबत बदललेला सूर पाहून विरोधी सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रभाग सभेत कुलकर्णी यांनी अधिकाºयांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला होता.