मुख्याध्यापकांचा आज मोर्चा
By Admin | Updated: January 24, 2016 23:59 IST2016-01-24T23:30:47+5:302016-01-24T23:59:48+5:30
मान्यतावर्धितला विरोध : वेठीस धरीत असल्याचा आरोप

मुख्याध्यापकांचा आज मोर्चा
सिन्नर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने सर्व शाळांना सांकेतिक क्रमांक म्हणजेच मान्यता दिली असताना पुन्हा नवीन सांकेतिक क्रमांक (मान्यतावर्धित) मिळविण्यासाठी लेखी सूचना काढल्या आहेत.
या प्रस्तावाच्या प्रती शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटनांसह सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात तीव्र नापसंती व्यक्त केली असून, या निर्णयाविरोधात मुख्याध्यापक संघटनांसह सर्व संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सोमवारी (दि. २५) नाशिक येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मान्यतावर्धित करण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील शाळांच्या वार्षिक तपासणी अहवालाची मागणी केली जाते. शाळा तपासणीसाठी अधिकारी येत नाही. शिक्षण विभागाकडून काही शाळांची दहा वर्षांपासून तपासणी झालेली नाही. मुख्याध्यापकांना शिक्षण विभागातील लिपिक वेठीस धरतात. प्रस्ताव स्वीकारले जात नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांची कुचंबणा होत असल्याची तक्रार मुख्याध्यापक संघटनेने केली आहे. मोर्चात ५०० ते ६०० मुख्याध्यापक व सर्व संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. शिरसाठ, कार्यवाह एस. बी. देशमुख, के. के. अहिरे, आर. डी. निकम, एस. डी. शेलार, एस. के. सावंत, एस. एम. बच्छाव, शरद गिते, राजेंद्र लोंढे, सी. पी. कुशारे, ए. बी. काटे, माणिक मढवई, ए. के. कदम यांच्यासह मुख्याध्यापक व
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)