पालकांच्या छळाला कंटाळून ‘त्यांनी’ सोडले घर...
By Admin | Updated: August 26, 2016 22:16 IST2016-08-26T22:15:56+5:302016-08-26T22:16:20+5:30
मनमाड : चार बालकांची निरीक्षणगृहात रवानगी

पालकांच्या छळाला कंटाळून ‘त्यांनी’ सोडले घर...
मनमाड : पालकांकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने रागाच्या भरात घर सोडलेल्या नाशिक येथील चार अल्पवयीन मुलांना मनमाड रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे निरीक्षणगृहात रवाना करण्यात आले आहे.
गाडी क्रमांक १२३३६ लोकमान्य टिळक टर्मिनस-भागलपूर एक्स्प्रेस मनमाडच्या फलाट क्रमांक २ वर उभी असताना रेसुब कर्मचारी राकेश पहेल, ए. एन. देवरे, तिकीट तपासणीस समीर समधरकर यांना अल्पवयीन मुलगा व तीन मुली संशयास्पद निदर्शनास आल्या. त्यांना रेसुब कार्यालयात चौकशीसाठी आणले.
रेसुब निरीक्षक के.डी. मोरे यांनी या बालकांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता प्रवीण जयसिंग राठोड (१२), काजल जयसिंग राठोड (१३), उज्ज्वल महेश सोनवणे (११), स्रेहा संजय भालेराव (१०) (सर्व, रा. गुलाबवाडी, नाशिकरोड) अशी नावे त्यांनी सांगितली. यामधे दोघे बहीण भाऊ असून, सर्वजण एकमेकांचे नातेवाइक आहेत. ही बालके नाशिकच्या तक्षशीला विद्यालयात शिक्षण घेत आहेत. अधिक चौकशी केली असता या पालकांकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने घर सोडल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अधिकारी राकेश पहेल व शिल्पा शिंदे यांनी या बालकांची अन्य चौकशी व वैद्यकीय तपासणी करून बालनिरीक्षण गृहात रवाना केले.
मनमाड रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक ३ वर रेसुब कर्मचारी सुनील कुमावत, रामदयाल हे गस्त घालत असताना एक अल्पवयीन मुलगा विनातिकीट फिरताना आढळून आला. त्याची अधीक चौकशी केली असता त्याचे नाव रोहित राजेश सोळंकी (१०), रा. हरसूल, जि. औरंगाबाद असे असल्याचे समजले. घरच्यांना न सांगता घरातून पळून आलेल्या या अल्पवयीन मुलाला बालनिरीक्षणगृहात रवाना करण्यात आले. रेसुब कर्मचारी आर.के. मिना, त्रिपाठी, सुरेश पाटील यांनी ही कार्यवाही केली. (वार्ताहर)