हजरत दस्तगीर बाबांचा संदल साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:51 IST2019-12-17T00:50:49+5:302019-12-17T00:51:28+5:30
येथील लॅमरोडवरील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हजरत दस्तगीर बाबा यांचा संदल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हजरत दस्तगीर बाबांचा संदल साजरा
देवळाली कॅम्प : येथील लॅमरोडवरील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हजरत दस्तगीर बाबा यांचा संदल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यंदा हजारो भाविकांनी येथील दर्ग्यावर हजेरी लावत ‘जय हो बाबा की’चा उद्घोष केला. या निमित्ताने नाशिक परिसरातील फकिरांनी गायलेल्या कव्वालीने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. काही भाविकांनी ढोल पथकाच्या तालावर ठेका धरीत उरुसचा आनंद लुटला. सायंकाळी येथील रहिवासी ज्ञानेश्वर गोडसे यांच्या घरात मुख्य पूजा पार पडली. यावेळी उपस्थित भाविकांनी डोक्यावर संदल, फुलांच्या चांदरी, नवीन गलफ यांचे तबक डोक्यावर घेत ढोल-ताशाच्या ठेक्यावर मिरवणूक काढण्यात आली. दस्तगीर बाबा सेवा समितीचे प्रमुख विजयबाबा उमाप यांना आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या रथावर विराजमान करण्यात आले होते. यावेळी मिरवणुकीत आमदार सरोज अहिरे, ज्ञानेश्वर गोडसे, नगरसेविका आशा गोडसे, चंद्रकांत गोडसे आदींसह सेवा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह भाविकांनी सहभाग घेतला. आदल्या दिवशी भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाने भजन सादर केले. लॅमरोड युवक मित्रमंडळ, शिवनेरी स्पोर्ट्स क्लब तसेच स्थानिक नागरिकांनी प्रसाद वाटपास सहकार्य केले.