‘हॉकर्स झोन’ मार्गी लागणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 23:55 IST2016-06-08T23:33:32+5:302016-06-08T23:55:17+5:30
महासभेवर प्रस्ताव : आॅगस्टपासून अंमलबजावणी शक्यं

‘हॉकर्स झोन’ मार्गी लागणार!
नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने निश्चित केलेल्या हॉकर्स झोनचा आराखडा मार्गी लागण्याची चिन्हे असून, येत्या १६ जून रोजी होणाऱ्या महासभेवर प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. महासभेची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आॅगस्ट २०१६ पासून हॉकर्स झोनची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने २३९ हॉकर्स झोन निश्चित केले असून, नोंदणीकृत ९६२० फेरीवाल्यांना सोडत पद्धतीने जागांचे वाटप केले जाणार आहे. शहरात ८३ ठिकाणे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आली असून, १७३ ठिकाणी मुक्त फेरीवाला क्षेत्र, तर ६६ ठिकाणी टाइम झोन निश्चित करण्यात आले आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून राष्ट्रीय फेरीवाला समित्यांच्या बैठका, पोलीस आयुक्तालयांचे अभिप्राय, क्षेत्रपाहणी या साऱ्या प्रकारातून जात महापालिकेने हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. शहर फेरीवाला समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रशासनाने मार्च २०१६ च्या महासभेत हॉकर्स झोनचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता. परंतु महापौर अशोक मुर्तडक यांनी हॉकर्स झोनबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर महापौरांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठकही बोलाविली होती; परंतु या बैठकीतही हॉकर्स झोनवर चर्चा न करता पुन्हा महासभेवर त्याबाबत निर्णय घेण्याचे महापौरांनी जाहीर केले. या टोलवाटोलवीत अखेर गुरुवार, दि. १६ जून रोजी होणाऱ्या महासभेत आयुक्तांनी पुन्हा एकदा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. दोन-तीन वेळा टोलवाटोलवी झाल्याने आता महासभेवर सदर प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. गटनेत्यांच्या झालेल्या बैठकीप्रसंगी नव्याने काही हॉकर्सची नोंदणी करण्याचे तसेच व्यवसायासाठी १५ वर्षांचे अधिवास प्रमाणपत्र घेण्याची सूचना करण्यात आली होती. येत्या महासभेत त्यावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. महासभेने प्रस्तावाला मंजुरी दिल्यास आॅगस्ट २०१६ पासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पुणे नंतर हॉकर्स झोनची अंमलबजावणी करणाऱ्याच्या यादीत नाशिकचा समावेश होणार आहे. (प्रतिनिधी)