नैराश्य जाण्यासाठी संवाद व्हावा

By Admin | Updated: April 16, 2017 23:28 IST2017-04-16T23:27:44+5:302017-04-16T23:28:15+5:30

आरोग्य जागृती : लेट्स टॉक कार्यक्रमातून मार्गदर्शन

Have a conversation to be depressed | नैराश्य जाण्यासाठी संवाद व्हावा

नैराश्य जाण्यासाठी संवाद व्हावा

नाशिक : आजच्या धावपळीच्या जीवनात तरुण वर्गात नैराश्याचे प्रमाण वाढले असून, या समस्येतून बाहेर पडण्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष सुळे यांनी ‘उदास वाटतंय ? लेट्स टॉक’ या कार्यक्रमात व्यक्त केले.
गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुढे बोलताना सुळे यांनी, आजच्या युवकांमध्ये वाढणारे नैराश्य ही चिंतेची बाब असल्याचे सांगत कोणतीही कृती मनासारखी झाली नाही तर हा तरुण नैराश्येच्या गर्तेत सापडतो, तसेच वैवाहिक आयुष्य जगताना तरुण जोडपे अधिकच नैराश्येने ग्रासलेले दिसून येत असल्याकडे लक्ष वेधले. संवाद खुंटत चालल्याने एकलकोंडेपणा  वाढतो आणि यामुळे नैराश्येत अधिक वाढ होत असल्याचेही सुळे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा रुग्णालयातील मनोविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर यांनी कवितेच्या माध्यमातून नैराश्य, ताण यावर मात कशी करता येते याविषयी मार्गदर्शन केले. इंडियन सायकॅट्रिक सोसायटी, डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मनोरंजनात्मक शैक्षणिक जनजागृती उपक्रमांतर्गत निवडक नाटकाचे प्रसंगदेखील दाखविण्यात आले. यावेळी डॉ. महेश भिरूड, डॉ. जयंत ढाके, डॉ. शिरीष सुळे, डॉ. उमेश नागापूरकर, डॉ. बी. एस. व्ही प्रसाद आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Have a conversation to be depressed