टाळ-मृदंगाच्या तालात हरिनामाचा गजर
By Admin | Updated: January 21, 2017 00:19 IST2017-01-21T00:18:53+5:302017-01-21T00:19:11+5:30
निवृत्तिनाथ यात्रा : यात्रेसाठी राज्यभरातील दिंड्यांचे शहरात आगमन

टाळ-मृदंगाच्या तालात हरिनामाचा गजर
नाशिकरोड : त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त पुणे-नगरकडून वारकऱ्यांच्या दिंड्यांचे नाशिकरोड भागात ठिकठिकाणी आगमन झाले आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात संतांच्या नामाचा गजर करत वारकरी दिंड्या मार्गक्रमण करत असल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा येत्या सोमवारी असून दरवर्षीप्रमाणे पुणे, अहमदनगरमार्गे त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या दिंड्यांचे गुरुवारपासून नाशिकरोड भागात आगमन होऊ लागले आहे. शिंदे, पळसे, सिन्नरफाटा, नाशिकरोड भागात अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या दिंड्या मुक्कामी थांबल्या आहेत. मुक्कामी थांबलेल्या दिंडी व वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी तसेच महाप्रसादासाठी भाविकांची ठिकठिकाणी गर्दी झालेली होती. नाशिक-पुणे महामार्गाने त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या दिंड्या मुक्तिधाममध्ये दर्शनासाठी थांबत आहे. (प्रतिनिधी)