‘खुशी’ लौट आयी...!
By Admin | Updated: December 5, 2015 23:16 IST2015-12-05T23:15:38+5:302015-12-05T23:16:55+5:30
सेलिब्रेशन : भावंडांसमवेत रमली ‘नंदिनी’

‘खुशी’ लौट आयी...!
अझहर शेख, नाशिक
यहॉ बहोत लोग हैं, और अच्छा लग रहा हैं मम्मी-पापा के साथ..., हॉ मुझे बहुत याद आ रहीं थी सब की... अशा गोड आवाजात चिमुक ल्या ‘नंदिनी’ने स्वगृही भावंडांसमवेत बागडत संवाद साधला. शर्मा कुटुंबीयांची नंदिनी सहा महिन्यांनंतर सुखरूप परतल्याने जणू त्यांच्या घरी आता ‘दिवाळी’च साजरी होत आहे. ‘हमारे घर की छह माह से लुटी हुयी खुशियां हमे नंदिनी के रुप में भगवानने वापस लौटा दी हैं’ अशा दबक्या स्वरात मत व्यक्त करताना नंदिनीची आई प्रेमकाली देवी व वडील महेंद्र यांच्या आनंदाश्रूचा बांध फुटला.
गेल्या १५ मे रोजी सातपूर-गरवारे लिंक रोडवरील घराच्या उंबरठ्यावर खेळत असताना सकाळी आठ वाजेच्या सुमारास साडेचार वर्षीय नंदिनीचे वाहनातून अपहरण करण्यात आले होते. तेव्हापासून शर्मा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. दोन-तीन दिवस या कुटुंबीयाने घरात चूलदेखील पेटविली नव्हती. निरागस, बोलकी, चाणाक्षबुध्दीची नंदिनीला माता-पित्यांच्या नजरा दाहीदिशा धुंदाळत होत्या. नंदिनीचा शोध घेण्यासाठी शर्मा दाम्पत्याने सर्व मंदिरांचे उंबरे झिजविले, तर अनेक शहरे पालथी घातली. सहा महिने उलटून गेल्यानंतर नंदिनी गेल्याच्या दु:खातून काहीसे सावरत नव्या उमेदीने, जिद्दीने शर्मा दाम्पत्याने प्रयत्न सुरूच ठेवले होते. सातत्याने सातपूर पोलीस ठाण्यात जाऊन पाठपुरावा करत होते. शुक्रवारचा दिवस उगवला तो आनंदाची बातमी घेऊनच. सातपूर पोलीस कर्मचारी घरी आले आणि त्यांनी ‘नंदिनी’ सुखरूप मिळाल्याची शुभवार्ता ऐकविली. नंदिनीच्या रूपाने घरी ‘लक्ष्मी’च आली आणि शुक्रवारच्या संध्याकाळी शर्मा कुटुंबीयांच्या घरात दिवाळीच साजरी झाली.