नाशिक : महापालिकेकडून मिळकत सर्वेक्षणाची तयारी सुरूअसतानाच घरपट्टी व पाणीपट्टी विभागांतील वसुली कर्मचाऱ्यांना पालिका निवडणुकीच्या कामात जुंपण्यात आल्याने या महिनाअखेर सुरू होणारे मिळकत सर्वेक्षण लांबणीवर पडणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीत गत वर्षाच्या तुलनेत कमालीची घट झाल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी शहरातील सुमारे साडेचार लाख मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला मागील महिन्यात स्थायी समितीने हिरवा कंदील दाखविल्यानंतर महापालिकेच्या घरपट्टी विभागाने सर्वेक्षण करणाऱ्या संबंधित एजन्सीला कार्यादेश दिले होते. त्यानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात केली जाणार होती. या सर्वेक्षणासाठी संबंधित एजन्सीने दीडशे पथके तयार केली असून, या पथकासोबत मनपाच्या घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील प्रत्येकी एक कर्मचारी दिला जाणार होता. परंतु, फेबु्रवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय मतदार याद्यांची फोड करण्याच्या कामासाठी प्रशासनाने घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना जुंपले आहे. त्यामुळे महापालिकेमार्फत होणारी घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीवरही परिणाम जाणवू लागला आहे. यापूर्वी, घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीच्या कामासाठी जुंपण्यात आले होते. त्यावेळीही वसुलीचे कामकाज ठप्प झाले होते. आता पुन्हा निवडणुकीच्या कामात गुंतल्याने मनपाच्या वसुलीवर परिणाम तर झालाच शिवाय नोव्हेंबरअखेर होणारे मिळकत सर्वेक्षणही लांबणीवर पडणार आहे. (प्रतिनिधी)
मिळकत सर्वेक्षण लटकणार
By admin | Updated: November 9, 2016 00:41 IST