सैन्यदलातर्फे ‘हँग ग्लायडर’ची चित्तथराक साहस मोहीम
By Admin | Updated: November 25, 2015 00:46 IST2015-11-24T23:32:26+5:302015-11-25T00:46:17+5:30
पोलाची ते नाशिक प्रवास : १३ व्या आर्टिलरी रेजिमेंटच्या जवानांचा सहभाग

सैन्यदलातर्फे ‘हँग ग्लायडर’ची चित्तथराक साहस मोहीम
कोल्हापूर : मंगळवारी सकाळी सकाळी सूर्यकिरणांसोबत उजळाईवाडी येथील विमानतळ परिसरात भले मोठे पतंगाच्या आकाराचे हँग ग्लायडर उतरले होते. हे कोणत्या प्रकाराचे विमान आहे, याबाबत नागरिकांना उत्सुकता असल्याने अनेकांनी विमानतळाच्या परिसरात गर्दी केली होती. मात्र, सैन्यदलातील आर्टिलरी रेजिमेंटच्या वतीने अॅडव्हेंचर्स स्पोर्टस्च्या प्रमोशनसाठी हे हँग ग्लायडर कोल्हापुरात दाखल झाल्याचे सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर याबाबतची उत्सुकता कमी झाली.
सैन्यदलाच्या १३ व्या आर्टिलरी रेजिमेंटतर्फे दि. १६ ते २७ नोव्हेंबरदरम्यान केरळमधील पोलाची ते महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत ‘हँग ग्लायडर’ या साहसी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. साहसी प्रयोग हा लष्करी प्रशिक्षणातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
हँग ग्लायडिंग हा जगातील साहसी क्रीडाप्रकारांतील एक खेळ आहे. या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सैन्यदलातर्फे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आकाशात झेप घेऊन या साहसी खेळाचा प्रसार सैन्यदलाचे जवान करणार आहेत.
पतंगाच्या आकाराचे दोन भले मोठे ग्लायडर वापरण्यात येते. सुमारे १५ हॉर्स पॉवरचे, टू स्ट्रोक इंजिन असलेले हे हँग ग्लायडर जमिनीपासून ४०० ते ५०० फूट उंचीवर जाते. छोट्या विमानाप्रमाणे व्यक्ती त्याच्यासोबत उडू शकतो. हा साहसी प्रयोग लष्करी प्रशिक्षणातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या साहसी प्रयोगांचे उद्दिष्ट पूर्ण लष्करी पलटणीवर बिंबविलेले असते, असे लेफ्टनंट कर्नल विवेक कुमार यांनी सांगितले.
दोन जवान ग्लायडरद्वारे उड्डाण करीत साताऱ्याकडे रवाना झाले. या टीमचे कर्नल आर. के. मिश्रा हे नेतृत्व करीत आहेत. यासह लेफ्टनंट कर्नल विकेश कुमार, नायब सुभेदार माणकेश सिंग, हवालदार मंगल देबबर्मा, रवींदर सिंग, ए. सेल्व्हम, संजीव कुमार, सतीश कुमार, एम. डी. बर्मा, देवरे गोकुळ, नागराज यांचा समावेश आहे....
असा आहे प्रवास
पोलाची, मंगलोर, कुमठा, दक्षिण गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सातारा, देहू रोड व नाशिक.