हात उंचावूनच होणार मतदान
By Admin | Updated: April 1, 2017 01:37 IST2017-04-01T01:37:41+5:302017-04-01T01:37:56+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेची आगामी दि. ५ एप्रिलची विषय समिती सभापतिपदाची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी निवडणुकीतील रंगत वाढू लागल्याचे चित्र आहे.

हात उंचावूनच होणार मतदान
नाशिक : जिल्हा परिषदेची आगामी दि. ५ एप्रिलची विषय समिती सभापतिपदाची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी निवडणुकीतील रंगत वाढू लागल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने विषय समिती सभापती निवडीचे अधिकार पीठासन अधिकाऱ्यांना असल्याचे आधी जाहीर केले होते; मात्र कायद्याचा अभ्यास केल्यानंतर सभापतिपदांच्या जागेपेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यास या पदांसाठी हात उंचावून मतदान घेण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे २००७ ते २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉँग्रेसकडे बहुमत असतानाही विषय समिती सभापती निवडणुकीत विरोधी पक्षातील सदस्य शिवसेनेचे अनिल कदम व भाजपाचे अरुण अहेर विषय समिती सभापतिपदी निवडून आले होते. त्यावेळी आघाडीची मते फुटल्याचे स्पष्ट झाले होते. राज्यभरात कमी अधिक प्रमाणात हाच प्रकार त्यावेळी घडल्यानंतर आघाडी सरकारने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विषय समिती सभापती निवडणुकीसाठी हात उंचावून निवडणूक घेण्याचा कायदा केला. आताही शिवसेना-कॉँग्रेस व भाजपा-राष्ट्रवादी यांच्यात अवघ्या दोन मतांचे अंतर असल्याने फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यातच विषय समिती सभापती पदासाठी बिनविरोध निवड न झाल्यास मतदान घेण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती निवड कायदा १९६२ च्या कलम ८ ड (११) नुसार महिला व बालकल्याण समिती तसेच समाजकल्यण समिती या सभापती पदासाठी थेट निवडणूक घेण्यात येईल. तर उर्वरित दोन विषय समिती सभापती पदासाठी दोन पेक्षा जास्त उमेदवार असतील तर त्यासाठीही हात उंचावून मतदान घेण्यात येईल. त्या परिस्थितीत सभागृहातील उपस्थितीत ७३ सदस्यांना प्रत्येकी दोन मते देण्याचे अधिकार राहतील. कारण दोन विषय समिती सभापतींची निवड होणार आहे. पहिल्या दोन क्रमांकाची मते मिळविणारे उमेदवार दोेन विषय समिती सभापतिपदी निवडले जातील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या एकूणच काठावरील बहुमतामुळे सेनेला सत्ता राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागण्याची चिन्हे आहे. (प्रतिनिधी)