देणाऱ्यांचे हात मदतीसाठी सरसावले

By Admin | Updated: September 29, 2016 01:25 IST2016-09-29T01:24:29+5:302016-09-29T01:25:17+5:30

माणुसकीचा गहिवर : विश्वास बॅँकेकडून मुलीला नोकरी, सोशल नेटवर्किंगने घेतली कोर्ट खर्चाची हमी

The hands of the pilgrims came to help | देणाऱ्यांचे हात मदतीसाठी सरसावले

देणाऱ्यांचे हात मदतीसाठी सरसावले

संजय वाघ  नाशिक
समाजात वाईट प्रवृत्तीची माणसे पावलोपावली भेटतात म्हणून माणुसकी पूर्णपणे रसातळाला गेली असे नव्हे, समाजाप्रती बांधिलकी जपणारी माणसेही आपल्या अवतीभोवतीच नांदत असतात, त्यांचे प्रत्त्यंतर आले की माणुसकीचा गहिवर आणि चांगुलपणा आजही शाबूत असल्याची भावना दृढ झाल्यावाचून राहत नाही. याचा प्रत्यय बुधवारी अनुभवयास आला.. निमित्त होते लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या परिवाराच्या कैफियतीचे!
आयुष्यभर वंचितांच्या दु:खाला आणि श्रमिकांच्या वेदनेला वाचा फोडणाऱ्या वामनदादांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराची वाताहत झाल्याचे ‘तुफानातील दिवा विझल्यानंतर कुटुंबही ‘अंधारा’त!’ हे वृत्त ‘लोकमत’मध्ये दि. २८ रोजी प्रसिद्ध झाले. मुलगा रवींद्र कर्डक व नातू वैभव यांनी उदरनिर्वाहासाठी सिक्युरिटीची नोकरी पत्करली परंतू त्यांच्या या नोकरीमुळे वामनदादांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचते असा आक्षेप घेतला गेल्याने पिता-पुत्रावर बेरोजगारीची वेळ आली होती. शासनातर्फे दादांना मंजूर झालेल्या सदनिकेचा ताबा मिळण्याचा तसेच नात कोमलच्या शिक्षणाचा आणि नोकरीचा प्रश्नही कर्डक परिवाराला सतावत होता. कर्डक परिवाराची आपबिती वाचून अनेकांनी हळहळ व्यक्त केली तर देणाऱ्यांचे हात मदतीसाठी पुढे सरसावले. त्यात पहिले नाव होते विश्वास बॅँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर यांचे. त्यांनी कर्डक परिवाराला बॅँकेत बोलावून तुमच्या मुलीला बॅँकेत नोकरी देतो तसेच तुम्ही ज्या भागात राहत असाल तेथील शाखेत तिला कामावर घेण्याचे जाहीर केले.
नाशिकमधीलच सोशल नेटवर्किंग फोरमनेदेखील मदतीचा हात पुढे केला. कर्डक परिवाराला आर्थिक मदतीसह वामनदादांना मंजूर झालेली सदनिका त्यांच्या वारसाला मिळवून देण्यासाठी न्यायालयीन कामकाजाकरिता जो खर्च लागेल तो सर्व उचलण्याची हमी या फोरमने घेतल्याचे प्रमोद गायकवाड, विलास यशवंते, निलेश कळसकर, अ‍ॅड. गुलाब आहेर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: The hands of the pilgrims came to help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.