स्वच्छतेच्या कंत्राटात ‘हात’सफाई
By Admin | Updated: August 22, 2015 00:10 IST2015-08-22T00:08:42+5:302015-08-22T00:10:25+5:30
स्थायी समितीकडून पोलखोल : साधुग्राममध्ये धडक देत केली चौकशी; ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश

स्वच्छतेच्या कंत्राटात ‘हात’सफाई
नाशिक : साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्याबाबतचा वाद न्यायप्रविष्ट असताना महापालिका प्रशासनाने स्थायीची मान्यता न घेता ठेकेदारांच्या माध्यमातून परस्पर १२६१ सफाई कामगारांना काम दिल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याची तक्रार करत स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी अगोदर प्रशासनाला धारेवर धरले आणि बैठकीनंतर लागलीच साधुग्राममध्ये थेट धडक देत स्वच्छतेच्या कामात ठेकेदारांकडून हातसफाई होत असल्याची पोलखोल केली. ठेकेदारांकडून निविदेप्रमाणे कामगारांना सोयीसुविधा पुरविल्या नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनीही त्याबाबत गांभीर्याने घेत संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आरोग्य विभागाला दिले.
साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्याचा वाद गेल्या दोन महिन्यांपासून गाजतो आहे. प्रकरण न्यायालयात गेले असताना आता स्थायी विरुद्ध प्रशासन यांच्यात अधिकारावरून जुंपली आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. या प्रकरणाचा प्रारंभापासून पाठपुरावा करणारे प्रा. कुणाल वाघ यांनी सभापतींना पत्र देऊन वॉटरग्रेस प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली तसेच प्रशासनाकडून सार्या प्रक्रियेत ठेकेदाराला पाठीशी घातले गेल्याचा आरोप केला. त्यानंतर शोभा फडोळ, राहुल दिवे यांचेसह सभापती शिवाजी चुंभळे यांनी एकेक मुद्यावर प्रशासनाला घेरण्यास सुरुवात केली. आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी आयुक्तांनी निविदेनुसार करारनाम्यातील अटी-शर्ती कलम १४ नुसार स्वत:च्या अधिकारात तीन पाळ्यांमध्ये ठेकेदारामार्फत १२६१ कामगारांना सफाईचे काम दिले असल्याचे स्पष्ट केले आणि या कामगारांना स्वच्छता व साफसफाईच्या लेखाशीर्षातून वेतन अदा केले जाणार असल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनीही सदर वेतनाची रक्कम अदा करण्यासाठी पुन्हा स्थायीची मंजुरी घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. सुमारे दोन-अडीच तास स्वच्छतेच्या ठेक्यावर काथ्याकूट झाला. अखेर सभापती शिवाजी चुंभळे यांनी साधुग्राममध्ये नेमलेल्या कामगारांना स्थायी समितीसमोर हजर करण्याचे आरोग्याधिकार्यांना आदेशित केले.