बससेवेबाबत पुन्हा झटकले हात
By Admin | Updated: April 22, 2017 00:53 IST2017-04-22T00:53:20+5:302017-04-22T00:53:30+5:30
नाशिक : शहर बससेवा एकतर महापालिकेने ताब्यात घ्यावी अन्यथा तोटा भरून द्यावा, अशी मागणी करण्यात आल्यानंतर महापालिकेने त्याबाबत हात झटकले

बससेवेबाबत पुन्हा झटकले हात
नाशिक : एसटी महामंडळामार्फत तोट्यात चालणारी शहर बससेवा एकतर महापालिकेने ताब्यात घ्यावी अन्यथा तोटा भरून द्यावा, अशी मागणी करण्यात आल्यानंतर महापालिकेने त्याबाबत हात झटकले असून, बससेवा महामंडळानेच चालवावी याबाबतचा ना हरकत दाखला २६ आॅगस्ट २००९ रोजीच तत्कालीन आयुक्त भास्कर सानप यांनी दिल्याचे निदर्शनास आले आहे.
एसटी महामंडळाकडून तोट्यात चालणारी शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी याबाबत वारंवार महापालिकेकडे पत्रव्यवहार सुरू आहे. पाच वर्षांत एसटी महामंडळाला शहर बससेवेच्या माध्यमातून १०८ कोटी ७१ लाख रुपयांचा तोटा झाला असून, तो महापालिकेने भरून द्यावा, अन्यथा शहर बससेवा ताब्यात घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, महामंडळाने पुन्हा एकदा महापालिकेला इशारा देत शहर बससेवा १ मेपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने याबाबत हात झटकले असून, महामंडळाला ना हरकत दाखला २६ आॅगस्ट २००९ रोजीच पाठविल्याचे स्पष्ट केले आहे, गुरुमित बग्गा यांनीही महामंडळाच्या या इशाऱ्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत महामंडळाचा तोटा भरून देण्यास महापालिका बांधील नसल्याचे स्पष्ट केले
आहे. (प्रतिनिधी)