वर्गणीतून अपंगाला मिळाली हातगाडी
By Admin | Updated: June 12, 2016 23:35 IST2016-06-12T22:24:39+5:302016-06-12T23:35:24+5:30
तरुणांची माणुसकी : रोजगारासाठी लावला हातभार; उपक्रमाचे होतेय कौतुक

वर्गणीतून अपंगाला मिळाली हातगाडी
संजय शहाणे इंदिरानगर
धूप, अगरबत्तीच्या पिशव्या खांद्यावर लटकवून उन्हातान्हात फिरणाऱ्या अपंग युवकाची परिस्थिती लक्षात आल्यानंतर येथील दहा मित्रांनी वर्गणी काढून स्टीलची हातगाडी भेट देत अपंग इसमाला उदरनिर्वाहासाठी हातभार लावल्याने या तरुणांचे परिसरात कौतुक होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून इंदिरानगर परिसरात कैलास निर्मल हे सिडकोत राहणारे अपंग गृहस्थ अगरबत्ती विकण्यासाठी दारोदार फिरतात. पत्नी, आई-वडील आणि मुलगी अशा कुटुंबातील सदस्यांची त्यांच्यावर जबाबदारी आहे. एका छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून, अपंग कैलास यांच्यावरच त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे. त्यामुळे सकाळी सकाळी दोन्ही खांद्यांवर आणि हातात पिशव्या घेऊन ते घरोघरी अगरबत्ती विक्री करण्यासाठी फिरत असतात.
काही दिवसांपूर्वी खांद्यावर बोजा घेऊन कसाबसा चालणारा हा अपंग इसम सुनील अलिझाड या तरुणाच्या दृष्टीस पडला. बोझा घेऊन चालणेही अशक्य असल्याचे पाहून सुनील यांनी त्याची चौकशी केली. त्याच्या घरची परिस्थिती पाहून सुनील याने ही बाब आपल्या मित्रांना सांगितली. तेव्हा सर्वांनी अपंग कैलास यांना मदत करण्याचा निश्चिय केला. त्यानुसार कैलास निर्मल यांना हातगाडी बनवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुनील अलिझाड, संतोष नंदा, शिवाजी भालेराव, अनिल कर्पे, संजय शहाणे, आतिफ मिर्झा, रोहन पटेल, सचिन कोठारी, वैभव जाधव, अनिल जाधव, वानखेडे, नंदा, अस्लम शेख, अजीम शेख, अरुण खैरनार, मनिष जोशी आदि मित्रांनी वर्गणी काढून स्टीलची हातगाडी बनवून घेतली. सदर हातगाडी रविवारी निर्मल यांना देण्यात आली. सर्व सुविधांनीयुक्त अशी ही हातगाडी असून, ढकलण्यास सुलभ तसेच साहित्य ठेवण्यासाठी सुरक्षित जागा, ऊन, वाऱ्यापासून वाचण्यासाठीची व्यवस्था या ढकलगाडीला करण्यात आलेली आहे.