शांतीनगरवासीयांचा पाण्यासाठी हंडामोर्चा
By Admin | Updated: October 11, 2015 00:04 IST2015-10-11T00:03:49+5:302015-10-11T00:04:09+5:30
अंबड येथील शांतीनगर झोपडपट्टी वसाहतीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी काढलेला हंडामोर्चा.

शांतीनगरवासीयांचा पाण्यासाठी हंडामोर्चा
सिडको : अंबड येथील शांतीनगर झोपडपट्टी वसाहतीत पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर हंडामोर्चा काढला. पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा यासह आरोग्य, रस्ते, बंद पथदीप यांबाबत विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सिडकोतील प्रभाग क्र. ५१ मध्ये अंबड येथील शांतीनगर झोपडपट्टी वसाहतीचा समावेश आहे. सुमारे चार हजारांहून अधिक लोकवस्ती असलेल्या या वसाहतीतील नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर हंडामोर्चा काढला. याआधीही नागरिकांनी नगरसेवकांना घेराव घातला होता, परंतु यानंतरही पाणीप्रश्न सुटत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे, या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ते दुरुस्त करावेत तसेच पथदीपांचेही दुरुस्ती करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी बाबासाहेब पेंढारकर, अमोल धिवरे, ताराबाई आहिरे, आकाश घेवडे, लखन चव्हाण, सिद्धार्थ साळवे, पंडित ससाने यांसह नागरिक सहभागी झाले होते.