अनधिकृत बांधकामांवर हातोडा

By Admin | Updated: March 25, 2015 01:31 IST2015-03-25T01:30:27+5:302015-03-25T01:31:03+5:30

अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Hammer on unauthorized constructions | अनधिकृत बांधकामांवर हातोडा

अनधिकृत बांधकामांवर हातोडा

नाशिक : अपुऱ्या पोलीस बळामुळे अनधिकृत बांधकामांविरोधी मोहिमेत खंड पडल्यानंतर महापालिकेने मंगळवारी पोलीस बंदोबस्त मिळताच महात्मानगर आणि कॉलेजरोड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. दिवसभर चाललेल्या या मोहिमेत रस्त्यांच्या दुतर्फा असलेली ४७ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली, तर रस्त्यांवर व्यावसायिकांकडून ठेवण्यात आलेले ९३ जाहिरात फलक जप्त करण्यात आले. प्रामुख्याने कॉलेजरोडवरील बिग बझारच्या अनधिकृत बांधकामावरही पालिकेने जेसीबी चालविला. तीन महिन्यांपूर्वी गंगापूररोड, पाथर्डी फाटा व पेठरोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण दर्शवित मोहीम थंडावली होती. दरम्यानच्या कालावधीत महापालिकेने किरकोळ स्वरूपातील अतिक्रमणे हटविली; परंतु मोठी कारवाई होत नव्हती. महापालिकेने पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी पोलीस आयुक्तालयाकडे वारंवार स्मरणपत्रे पाठविली; परंतु त्याची दखल घेतली जात नव्हती. मंगळवारी पुरेसा पोलीस फौजफाटा मिळाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने महात्मानगर येथील एबीबी सर्कलपासून अनधिकृत बांधकामांविरोधी मोहिमेस सुरुवात केली. रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी उभारलेले ओटे, पत्र्याचे शेड्स तसेच जाहिरात फलक हटविण्यात आले. त्यात प्रामुख्याने झायकॉन डेंटल क्लिनिक अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे अनधिकृत शेड काढण्यात आले. याशिवाय नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक, ठाणे जनता बॅँक यांच्यासमोरील ओटे, पेव्हर ब्लॉक्स हटविण्यात आले. मोहीम सुरू असल्याचे पाहून काही व्यावसायिकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केली. महात्मानगरनंतर पथकाने कॉलेजरोडवर आपला मोर्चा वळविला. कॉलेजरोडवरील बिग बझारबाहेरील फूड स्टॉल, विजन हॉस्पिटलची संरक्षक भिंत हटविण्यात आली. मोहिमेदरम्यान, ४ वाहने भरून जाहिरात फलक व साहित्य जप्त करण्यात आले. मोहिमेत महापालिकेचे ६० कर्मचारी आणि ४० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Hammer on unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.