अनधिकृत बांधकामांवर हातोडा
By Admin | Updated: March 15, 2015 01:19 IST2015-03-15T01:19:22+5:302015-03-15T01:19:43+5:30
अनधिकृत बांधकामांवर हातोडा

अनधिकृत बांधकामांवर हातोडा
सातपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने दीर्घ विश्रांतीनंतर शुक्रवारी सातपूर परिसरातील बारदानफाटा ते महिंद्रा अॅण्ड महिंद्रा प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. यावेळी बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, फलक तसेच शेडस् पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. महापालिकेने सकाळी पोलीस बंदोबस्तात बारदानफाट्यापासून अतिक्रमणविरोधी मोहिमेला प्रारंभ केला. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंतची रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सदर मोहीम चालली. या मोहिमेत प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, अनधिकृत बांधकामे, टपऱ्या, फलक हटविण्यात आले. मोहीम सुरू असतानाच काही व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले, तर काही व्यावसायिकांनी मुदत मागून घेतली. अतिक्रमणधारकांनी यावेळी कोणताही विरोध केला नाही. यापुढेही सदर मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती सातपूरचे विभागीय अधिकारी महेंद्र पगारे यांनी दिली. मोहिमेत सुमारे ७७ अनधिकृत बांधकामे, रस्त्याच्या मार्जिनमधील ३४ अनधिकृत फलक काढण्यात आले. त्यासाठी विविध विभागांतील ८० कर्मचारी, तीन जेसीबी, चार विभागांतील वाहने तसेच सातपूर-गंगापूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह ८० पोलीस कर्मचारी तैनात होते. याशिवाय सातपूर, सिडको, पंचवटी व नाशिकरोड विभागाचे अधिकारी, सहायक अधीक्षक, नगररचना विभागाचे उपअभियंता गोकुळ पगारे, कनिष्ठ अभियंता भीमराव खोडे, भामरे, रमेश पाटोळे, बी. वाय. शिंगाडे, अे. अे. खान, ए. व्ही. जाधव, विश्वास कांबळे आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)