सोमवारपासून पुन्हा अतिक्रमणांवर हातोडा

By Admin | Updated: January 16, 2015 23:35 IST2015-01-16T23:30:04+5:302015-01-16T23:35:11+5:30

९० टक्के रेड मार्किंग पूर्ण : थकबाकीदार गाळेधारकांवरही कारवाई सुरूच

Hammer on encroachment again since Monday | सोमवारपासून पुन्हा अतिक्रमणांवर हातोडा

सोमवारपासून पुन्हा अतिक्रमणांवर हातोडा

नाशिक : नागरिक व व्यावसायिकांना स्वत:हून सामासिक अंतर तपासून अतिक्रमित बांधकाम काढून घेण्यासंदर्भात आठ दिवसांची मुदत दिल्यानंतर आता येत्या सोमवारपासून (दि.१९) पुन्हा एकदा शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवर हातोडा पडणार असून, शहरात अनधिकृत बांधकामांवर रेड मार्किंगचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.
मागील आठवड्यात गंगापूररोड आणि पेठरोड परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी या मोहिमेचा धसका घेतला. अतिक्रमण विभागाचा जेसीबी चाल करून येण्यापूर्वीच गंगापूररोड आणि पेठरोड परिसरातील व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमित बांधकाम काढून घेणे पसंत केले. त्यानंतर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मोहीम आठ दिवसांपुरता थांबविण्याचे जाहीर करतानाच संबंधित व्यावसायिक व नागरिकांनी सामासिक अंतरातील बांधकाम तपासून घेत अतिक्रमित बांधकाम स्वत:हून काढून घेण्याचे आवाहन केले अन्यथा अतिक्रमण काढण्यासाठी येणारा खर्च संबंधितांच्या घरपट्टीतून वसूल करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याचबरोबर गेल्या आठ दिवसांत महापालिकेच्या नगररचना आणि बांधकाम विभागाने मोहीम राबवित अतिक्रमित बांधकामांना रेड मार्किंगचे काम केले. परिणामी, अनेकांनी स्वत:हून अतिक्रमित बांधकाम, शेडस्, ओटे, संरक्षक भिंती हटविल्या. आता आठ-दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारपासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा धडाका पाहायला मिळणार असून, कोणत्या भागात मोहीम राबविली जाणार आहे, याबाबत गुप्तता ठेवण्यात आली आहे. नागरिकांना अजूनही दोन दिवस अतिक्रमित बांधकाम स्वत:हून काढून घेण्यासाठी संधी देण्यात आली आहे.

Web Title: Hammer on encroachment again since Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.