हमाल, मापाऱ्यांचा बंद मागे
By Admin | Updated: March 21, 2016 23:49 IST2016-03-21T23:32:47+5:302016-03-21T23:49:15+5:30
तात्पुरता तोडगा : पाल उभारण्यास परवानगी; दोन दिवसांत निर्णय

हमाल, मापाऱ्यांचा बंद मागे
पंचवटी : पेठरोडवरील शरदश्चंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या गाळ्यांच्या बाहेर बाजार समितीने हमाल व मापाऱ्यांसाठी शेड उभारून द्यावे, या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून हमाल व मापाऱ्यांनी बंद पुकारल्याने बाजार समितीतील कांदा-बटाटा व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. अखेर दुपारी उपसभापती, संचालक व भारतीय कामगार न्यायसभा यांच्यात चर्चा झाल्यानंतर बाजार समितीने गाळ्यांबाहेर तात्पुरते कापडी पाल उभारण्याच्या कामाला परवानगी दिल्याने अखेर बंद मागे घेण्यात आला.
गेल्या आठवड्याभरापूर्वी भारतीय कामगार न्याय सभेचे अध्यक्ष शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले होते, त्यानंतर बाजार समितीने आठ दिवसांची मुदत मागितली होती. परंतु सोमवारी आठवडा झाल्यानंतरही बाजार समितीने दखल न घेतल्याने भारतीय कामगार न्याय सभेच्या माध्यमातून पेठरोडच्या बाजार समितीत हमाल व मापाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते.
काम बंद आंदोलनामुळे कांदा, बटाटा व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. अखेर दुपारी बाजार समितीत उपसभापती शंकर धनवटे, संचालक तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, चंद्रकांत निकम, व्यापारी प्रतिनिधी अनिल बूब, जगदीश अपसुंदे, शेखर निकम यांच्यात सविस्तर चर्चा झाल्यानंतर सभापती बाहेरगावी असल्याने ते आल्यानंतर चर्चा करण्यात येईल त्यामुळे बाजार समितीने तात्पुरते कापडी पाल उभारण्यास परवानगीचे पत्र भारतीय कामगार न्याय सभेला दिले व बंद मागे घेण्यात आला. (वार्ताहर)