हमरीतुमरी : पिंपळगाव वाखारी येथे विविध विषयांवर चर्चा
By Admin | Updated: August 20, 2014 00:45 IST2014-08-19T22:09:21+5:302014-08-20T00:45:41+5:30
ग्रामसभेत बाचाबाची

हमरीतुमरी : पिंपळगाव वाखारी येथे विविध विषयांवर चर्चा
पिंपळगाव वाखारी : ग्रामपंचायतीची ग्रामसभा वनीकरणातील जंगलाची अवैध वृक्षतोड व अतिक्रमण या दोन मुद्द्यांवर वादळी झाली. वादळी चर्चेचे रूपांतर बाचाबाची व हमरीतुमरीत झाल्याने अनेक विषय चर्चेविना अपुरे राहिले.
सरपंच उत्तम जाधव व उपसरपंच प्रल्हाद पाटील यांच्या उपस्थितीत झालेली ग्रामसभा तरुणांच्या आक्रमक पवित्र्यामुळे वादळी ठरली. प्रारंभी रोजगार हमी योजना, कृषी योजना, पशुवैद्यकीय योजना, इंदिरा आवास योजना, वस्तीसुधार योजना आदिंबाबत ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांनी माहिती दिली. त्यानंतर ३०० हेक्टर क्षेत्रांतील वनविभागाच्या वनीकरणावर आदिवासींनी केलेल्या अतिक्रमणाचा विषय व अवैध होणारी वृक्षतोड याबाबत ज्ञानेश्वर कदम यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर ग्रामपंचायत वनविभाग व वनरक्षक समिती यांच्या दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड व अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. फक्त २८ लाभार्थी आदिवासींना वनजमीन मिळणार असल्याने इतर अतिक्रमित कुटुंबांना हाकलण्याचे प्रयत्न होण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली व ग्रामसभेत तसा ठराव संमत करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या चोरीच्या विषयावरही वादळी चर्चा झाली. चर्चेत दिलीप पाटील, ग्यानदेव वाघ, नदिश थोरात, विनायक वाघ, ज्ञानेश्वर कदम, अमोल अहिरे, नंदू वाघ, ना.ता. अहिरे यांनी भाग घेतला. (वार्ताहर)