नाशिक : पारंपरिक पीक पद्धती बदलून फळपिकांकडे वळालेले निफाड तालुक्यातील रानवड येथील अण्णासाहेब मधुकर वाघ हे केवळ दीड एकर क्षेत्रावरील लिंबांच्या बागेपासून वर्षाला ७ ते ८ लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवत आहेत. कमी कष्ट आणि कमी खर्चाचे हे पीक द्राक्षापेक्षाही चांगले असल्याचे ते सांगतात.अण्णासाहेब वाघ यांच्याकडे वडिलोपार्जित ४० एकर शेतजमीन आहे. प्रयोगशील शेतकरी म्हणून ते परिसरात परिचित आहेत. सर्व चुनखडक व मुरमाड जमिनीत त्यांचे वडील गहू, हरभरा, बाजरी असे पारंपरिक पीक घेत असत. कोरडवाहू क्षेत्र असल्यामुळे यातून केवळ हातातोंडाची गाठ पडण्यापलीकडे काही होत नव्हते. अण्णासाहेब हे स्वत: शेती करूलागले तेव्हा त्यांनी पीक पद्धती बदलून फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. विविध क्षेत्रांवर वेगवेगळी पीक घेत असतानाच त्यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रावर लिंबांची लागवड केली. सुरुवातीला त्यांनी एक एकर क्षेत्रावर कागदी जातीच्या लिंबाची लागवड केली. यासाठी लागणारी रोपे त्यांनी त्यावेळी घरच्या घरी तयार केली. त्यानंतर मशागत करून वावर केले व १२ बाय १५च्या अंतरावर त्यांनी लिंबांची लागवड केली. पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. पिकासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारे रासायनिक खत न वापरता लेंडी खताचा वापर केला. वेळोवेळी कीटकनाशकाची फवारणी केली. लागवडीनंतर लिंबाला साधारणत: दोन वर्षांनंतर बहार आला. सुरुवातीचा पहिलाच बहार असल्याने उत्पादन कमी झाले. त्यानंतर मात्र या बागेपासून त्यांचे उत्पादन वाढतच गेले.या पिकासाठी वाघ यांना केवळ सुरुवातीला खर्च करावा लागला. त्यानंतर मात्र केवळ पाणी भरणे आणि महिन्यातून एखादी फवारणी करण्याचा किरकोळ खर्च येतो. एका फवारणीला साधारणत: १५०० ते १६०० रुपये खर्च येतो. यामुळे कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून वाघ लिंबाकडे पाहतात.द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालुक्यात वाघ यांना लिंबांची शेती द्राक्षबागेपेक्षाही अधिक फायदेशीर वाटते. म्हणूनच ते लवकरच दुसऱ्या क्षेत्रावर लिंबांची लागवड करण्याचा विचार करीत आहेत. त्यांची जमीन चुनखडीयुक्त असल्यामुळे त्यांच्या क्षेत्रात लिंबू चांगले येतात, असे ते सांगतात. गुलाब, अॅपल बोर, डाळिंब, द्राक्ष, मिरची अशा वेगवेगळ्या पिकांची त्यांनी लागवड केलेली आहे. आजही शेती व्यवसाय फायदेशीरच आहे, असे ते सांगतात.सुरुवातीची एक एकर लिंब बाग उभी करण्यासाठी त्यांना ८ ते १० हजारांचा खर्च आला. ही बाग आज २० वर्षांची झाली आहे. त्यानंतर त्यांनी ९ वर्षांपूर्वी पुन्हा अर्धा एकरावर मल्हार जातीच्या लिंबाची लागवड केली. दरवर्षी त्यांना दीड एकरातून लिंबाचे २५ ते ३० टन उत्पादन मिळते. या मालाची ते शक्यतो जागेवरच विक्री करतात. किलोमागे त्यांना २० रुपयांचा दर मिळतो. उन्हाळ्यात हाच दर ७० ते ८० रुपये किलोपर्यंत जातो. यातून त्यांना वर्षाकाठी ७ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
दीड एकरमधील लिंबापासून वार्षिक आठ लाखांचे उत्पन्न
By संजय डुंबले | Updated: January 26, 2019 01:09 IST
पारंपरिक पीक पद्धती बदलून फळपिकांकडे वळालेले निफाड तालुक्यातील रानवड येथील अण्णासाहेब मधुकर वाघ हे केवळ दीड एकर क्षेत्रावरील लिंबांच्या बागेपासून वर्षाला ७ ते ८ लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवत आहेत. कमी कष्ट आणि कमी खर्चाचे हे पीक द्राक्षापेक्षाही चांगले असल्याचे ते सांगतात.
दीड एकरमधील लिंबापासून वार्षिक आठ लाखांचे उत्पन्न
ठळक मुद्देलिंबांच्या बागेपासून वर्षाला ७ ते ८ लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवत आहेत. पीक पद्धती बदलून फळबाग लागवडीचा निर्णय