नगरसूल येथे आगीत दीड एकर गहू खाक
By Admin | Updated: March 11, 2017 00:37 IST2017-03-11T00:37:28+5:302017-03-11T00:37:40+5:30
नगरसूल : तालुक्यातील नगरसूल येथे शेतात शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे दीड एकर गहू जळून खाक झाल्याची घटना घडली.

नगरसूल येथे आगीत दीड एकर गहू खाक
नगरसूल : तालुक्यातील नगरसूल येथे शेतात शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे दीड एकर गहू जळून खाक झाल्याची घटना घडली. येथील कुडके वस्तीवरील राधाकिसन मथु कुडके यांच्या शेतात दुपारी १२.३० ते १ वाजेदरम्यान विद्युतवाहिन्या एकमेकांना चिकटल्याने शॉर्टसर्किट झाले व शेतातील काढणीला आलेल्या गव्हाने पेट घेतला. यावेळी जोराचा वारा वाहत असल्याने आगीने उग्ररूप धारण केले होते. राधाकिसन मथु कुडके व त्यांच्याच शेजारी असलेल्या भाऊलाल रामभाऊ कुडके यांचे प्रत्येकी २५ गुठे गहू या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. जोराचा वारा वाहत असल्याने शेताजवळ असलेले यशवंत रामभाऊ कुडके, भाऊलाल कुडके यांचे घरे पेटण्याची शक्यता असल्याने आग विझविण्यासाठी आसपासच्या नागरिकांनी मोठे शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणून विझवली. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती मिळाल्याने काही वेळातच वीज वितरण कंपनीचे नगरसूल सबस्टेशनचे इंजिनिअर धनंजय पाटील यांच्यासह विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा मागोवा घेतला. नगरसूल तलाठी के. के. सुलाने यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाणी करून पंचनामा केला आहे. (वार्ताहर)