शस्त्रधारी गुंडांचा अंबडमध्ये हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST2020-12-23T04:12:34+5:302020-12-23T04:12:34+5:30
अंबड येथील स्वामी नगर भागात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोर गुंडांनी चांगलीच दहशत पसरवली आहे. यामुळे स्वामी नगर तसेच अंबड ...

शस्त्रधारी गुंडांचा अंबडमध्ये हैदोस
अंबड येथील स्वामी नगर भागात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोर गुंडांनी चांगलीच दहशत पसरवली आहे. यामुळे स्वामी नगर तसेच अंबड भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी बंद घराचा कडीकोयंडा वाजवून नागरिकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून धमकावणे, मारहाण करणे, घरांवर दगडफेक करणे असे प्रकार सध्या या गुंडांच्या टोळीकडून सुरू आहेत.
सोमवारी (दि.२१) रात्री असाच प्रकार घडला असून, स्वामी नगर भागातील स्थानिक रहिवासी संजय ढेरिंगे यांच्या घरावर तसेच भाडेकरूच्या घरावर दगडफेक करीत गुंडांनी चॉपरचा धाक दाखवून दहशत पसरवण्याचा प्रकार केला. याबाबत नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी अंबड पोलिसांना माहिती देऊन पाचारण केले .त्यानंतर पोलिसांनी मात्र नागरिकांची समजूत काढण्यामध्ये आपला वेळ वाया घालविल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. याबाबत नगरसेवक दीपक दातीर, प्रतिभा पवार,मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनीदेखील नागरिकांसोबत अंबड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांची भेट घेतली. पोलीस त्या गुंडांना ताब्यात घेणार का, असा प्रश्न केला.
चौकट
गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाणे हद्दीत गुंडगिरी वाढली आहे. गुन्हेगारांकडून खुलेआम दहशत बसवली जात असतानाही अंबड पोलिसांकडून मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने याबाबत अंबड पोलिसांच्या कारवाईबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिडको व अंबड भागातील गुन्हेगारीबाबत पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.