अक्सा कॉलनीत गटारीचे पाणी
By Admin | Updated: October 6, 2015 21:55 IST2015-10-06T21:54:13+5:302015-10-06T21:55:33+5:30
दरेगाव : दुर्गंधी पसरल्याने रोगराईची भीती, अक्सा कॉलनी रस्त्यात खड्डा

अक्सा कॉलनीत गटारीचे पाणी
मालेगाव : शहरातील अक्सा कॉलनी आणि दरेगावच्या रस्त्याला मोठा खड्डा पडला असून त्यात साचलेल्या गटारीच्या पाण्यामुळे अक्सा कॉलनी भागात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अक्सा कॉलनी भागात गेल्या दहा वर्षांपूर्वी रस्ता नसल्याने हाल होत होते. या भागातील नागरिकांनी मालेगाव बाह्यचे तत्कालीन आमदार विद्यमान सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांना भेटून आपली कैफियत मांडली होती. भुसे यांनी तात्काळ आपल्या या भागात भेट देऊन पाहणी करीत संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून घेतले होते. त्यावेळी दरेगाव आणि अक्सा कॉलनी भागाला जोडणारा मुरूम दगड टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. संबंधितांनी सदर रस्ता पक्का सिमेंटचा किंवा डांबरीकरण करून गटारीच्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी जुबेर शेख, असिफ तांबोळी, डॉ. रज्जाक पटेल यांनी केली आहे. नगरसेवकांचे दुर्लक्ष अक्सा कॉलनी भागात नगरसेवक विठ्ठल बर्वे कधीही फिरकत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अक्सा कॉलनी भागात गटारंींचे काम करण्यात आले. यामुळे काही नागरिकांना स्वत:च्या खर्चाने गटारीची कामे करावी लागली. गटारीच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.याबाबत मे महिन्यात नागरिकांनी महापौरांची भेट घेऊन त्यांच्याकडेही कैफियत मांडली. त्यावेळी पाच लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर करीत आहोत, असे सांगून महापौरांनी नागरिकांची बोळवण केली परंतु पाच महिने उलटले तरी समस्या मात्र अद्याप कायम आहे. यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत असून महापौरांनी नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करून सिमेंटचा पक्का रस्ता तयार करून गटारीच्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)