गुटखा, तंबाखू-पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगविल्या भिंती

By Admin | Updated: February 7, 2017 22:47 IST2017-02-07T22:47:04+5:302017-02-07T22:47:26+5:30

विभागीय कार्यालय : इच्छुकांच्या समर्थकांचा प्रताप

Gutkha, the walls painted by tobacco-makers | गुटखा, तंबाखू-पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगविल्या भिंती

गुटखा, तंबाखू-पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगविल्या भिंती

पंचवटी : ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ असा नारा देत प्रभागाचा विकास करण्यासाठीच आमची उमेदवारी असल्याचे स्पष्ट करून महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत हौशी उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवारी अर्ज सादर केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी मात्र आपला उमेदवार भावी नगरसेवक होण्यापूर्वीच विभागीय कार्यालयातील भिंतीवर गुटखा, तंबाखू व पानाच्या पिचकाऱ्या मारून परिसर रंगविला आहे.  उमेदवारी अर्ज सादर करताना अनेक समर्थकांचा थवा इच्छुकांच्या समवेत विभागीय कार्यालयातील निवडणूक कक्षात दाखल होत होता. अर्ज दाखल करण्यापूर्वी कोणी ना हरकत दाखला, तर कोणी निवडणूक कागदपत्रांची पूर्तता काय याच्या चौकशीकामी येत होते.  विभागीय कार्यालयात प्रवेश केल्यानंतर जिन्यात पायऱ्यांलगत स्वच्छ भारत अभियानचे ‘थांबा! थुंकू नका, सगळे बघताहेत, इतरांचाही विचार करा’ असे पत्रक लावलेले असले तरी या पत्रकाकडे पान, गुटखा खाणाऱ्या इच्छुक समर्थकांनी डोळेझाक करीत पत्रकापासून काही फुटाच्या अंतरावरच गुटखा, पानाच्या पिचकाऱ्या मारून भिंती रंगविण्याचा प्रताप केला आहे.  एकीकडे शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या भूलथापा देत विकासकामांच्या नावानं उमेदवारी करण्याचा ढिंडोरा पिटत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या नवख्या इच्छुकांनी व त्यांच्या समर्थकांनी भिंती रंगवून अशाप्रकारे नाशिक शहर स्वच्छ व सुंदर करणार का याचा विचार मतदारांनी योग्यवेळी करणे गरजेचे ठरणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Gutkha, the walls painted by tobacco-makers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.