पत्नीसह गुरुजींनी बॅँकेत स्वत:ला घेतले कोंडून
By Admin | Updated: April 27, 2017 01:54 IST2017-04-27T01:53:48+5:302017-04-27T01:54:10+5:30
नाशिक : चलन तुटवडा निर्माण झाल्यामुळे मागील महिनाभरापासून शिक्षकांना वेतनाची रक्कमदेखील मिळणे जिल्हा बॅँकेतून दुरापास्त झाले आहे.

पत्नीसह गुरुजींनी बॅँकेत स्वत:ला घेतले कोंडून
नाशिक : चलन तुटवडा निर्माण झाल्यामुळे मागील महिनाभरापासून शिक्षकांना वेतनाची रक्कमदेखील मिळणे जिल्हा बॅँकेतून दुरापास्त झाले आहे. त्यामुळे कंटाळून बागलाण तालुक्यातील एका अपंग शिक्षकाने पत्नीसह स्वत:ला जिल्हा बॅँकेच्या शाखेत अधिकाऱ्यांसह कोंडून घेतले.
जिल्हा बॅँकेकडून शेतकऱ्यांना नवे कर्ज वाटप होत नाही तसेच शेतकऱ्यांना वेतनाची रक्कमही मिळत नसल्याने खातेदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षकांच्या हातात पैसे प्राप्त होत नसल्याने त्यांचे दैनंदिन व्यवहार कोलमडले आहे. बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील रहिवासी शिक्षक प्रमोद धर्मा लोखंडे हे महिनाभरापासून पंचवटी कारंजा येथील जिल्हा बॅँकेच्या शाखेत भविष्य निर्वाह निधीची जमा केलेल्या रकमेतून मुलीच्या शिक्षणासाठी रकमेची मागणी करत आहे; मात्र आश्वासनांखेरीज त्यांना बॅँकेकडून कुठलीही रक्कम अद्याप दिली गेली नाही.
‘मोठी रक्कम असल्याने ती लवकर देता येणार नाही, बॅँकेकडे पैसे नाही’ हेच उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याने त्यांच्या संतापाचा बुधवारी (दि. २६) संध्याकाळी उद्रेक झाला. त्यांनी पत्नीसमवेत शाखेत येऊन बॅँकेचे शटर खाली खेचले आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्वत:ला कोंडून घेतले. जोपर्यंत रक्कम हातात मिळणार नाही, तोपर्यंत बॅँकेतून बाहेर पडणार नाही, आणि कोणालाही बाहेर पडू देणार नाही, असा पवित्रा लोखंडे व त्यांच्या पत्नीने घेतला. तब्बल दीड ते पावणेदोन तास त्यांनी बॅँकेचा मुख्य दरवाजा बंद ठेवला. सात वाजेच्या सुमारास बॅँकेचे व्यवस्थापक धनंजय धनवटे यांनी लोखंडे दाम्पत्यांना कक्षामध्ये बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र यावेळी त्यांचा संयम सुटला व त्यांनी आरटीजीएससह लेखी आश्वासनांची कागदपत्रे यावेळी टेबलावर फेकली. पैसे न दिल्यास पत्नीसह शाखेत आत्महत्या करू, असा इशारा दिला. वाद वाढल्याने त्यांनी मुख्य प्रशासकीय व्यवस्थापकांशी संतप्त लोखंडे यांचे भ्रमणध्वनीवरून बोलणे करून दिल्यानंतर लोखंडे यांनी काही तासांची मुदत देत असल्याचे सांगून बॅँकेचे शटर उघडले.