गुंडांनी घेतला समाजमंदिराचा ताबा
By Admin | Updated: September 15, 2015 22:29 IST2015-09-15T22:26:43+5:302015-09-15T22:29:23+5:30
अंबड येथील प्रकार : पोलिसांना साकडे

गुंडांनी घेतला समाजमंदिराचा ताबा
सिडको : अंबड येथील स्वामीनगरमधील रहिवासी गेल्या काही महिन्यांपासून परिसरातील गुंडांच्या दहशतीखाली वावरत आहेत.
रात्रीच्या वेळी दारू पिऊन धिंगाणा घालणे, जुगार खेळणे, महिलांची छेडछाड करणे आदि प्रकारांमुळे
येथील रहिवासी त्रस्त झाले असून, या गुंडांच्या दहशतीतून सुटका व्हावी, यासाठी आज त्यांनी मनपा,
तसेच पोलीस प्रशासनास निवेदन दिले आहे.
अंबड येथील स्वामीनगरमध्ये भर वस्तीत समाजमंदिर आहे. गेल्या काही दिवसांपासून या समाजमंदिराचा गुंडप्रवृत्तीच्या टोळक्यांनी ताबा घेतला आहे. या ठिकाणी दररोज हे गुंड रात्री उशिरापर्यंत दारू पिणे, जुगार खेळणे, महिलांची छेडछाड करून धिंगाणा घालतात. तसेच रात्री- अपरात्री रिक्षातून येत परिसरात आरडाओरड करून दहशत पसरविण्याचे प्रकार घडत आहे.
या सर्व गोष्टींमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत येथील परिसरातील महिला व नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते समाधान जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनपा, तसेच पोलिसांना आज निवेदन दिले. याप्रसंगी रवींद्र जगताप, दिलीप घडवजे, रमेश सोनार, संतोष बाविस्कर, चेतन घोडके, प्रमोद पवार, रेखा घडवजे, सविता शेलार, सुनीता जगताप, गौरव जाधव आदिंसह शेकडो महिला व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)