सुकेणे परिसरातील द्राक्षांना बेमोसमीचा फटका
By Admin | Updated: November 24, 2015 23:05 IST2015-11-24T23:04:43+5:302015-11-24T23:05:15+5:30
सुकेणे परिसरातील द्राक्षांना बेमोसमीचा फटका

सुकेणे परिसरातील द्राक्षांना बेमोसमीचा फटका
कसबे सुकेणे : गंगापूर धरणाच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कसबे सुकेणेसह बाणगंगाकाठच्या गावांवर संकटांची वक्रदृष्टी कायम असून, गेल्या दोन दिवसांपासून बेमोसमी पाऊस आणि खराब हवामान यामुळे या भागातील शेकडो हेक्टर द्राक्षबागांना फटका बसला आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.
शनिवारपासून पडणाऱ्या पावसामुळे कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव या भागातील १० ते १२ हेक्टरवरील द्राक्षबागांना फटका बसला आहे.
कसबे सुकेणे येथील बबन शेवकर यांच्या अडीच एकर बागेतील तयार द्राक्षघडांना चिरा गेल्या, तर बहुतांश शेतकऱ्यांच्या बागेतील द्राक्षमणी गळून पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय सदाशिव शेवकर, अर्जुन बोराडे, शरद कातकाडे, सोमनाथ हाळदे, प्रकाश मोगल, विजय शेवकर यांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कसबे सुकेणे परिसरातील शेतकऱ्यांचे धाबे दणाणले असून, खराब हवामानामुळे पिकांच्या रासायनिक औषधी खर्चात मोठी वाढ झाली आहे.
दोन दिवसांच्या बेमोसमी पावसामुळे द्राक्षघडांना चिरे गेल्याने द्राक्ष बागायतदारांचे तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या महिनाभरापासून कमी पाण्यामुळे पाण्याचे नियोजन करीत मेटाकुटीस आलेल्या द्राक्ष बागायतदारांना आता बेमोसमीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.