नवे नगरसेवक घेणार ज्येष्ठांचे मार्गदर्शन
By Admin | Updated: May 29, 2017 00:02 IST2017-05-29T00:01:50+5:302017-05-29T00:02:06+5:30
संगमेश्वर : मालेगाव शहराच्या पश्चिम भागात शिवसेना व भाजपाने जोरदार मुसंडी मारली असली, तरी त्यांचे १६ विजयी उमेदवार नवखे असल्याने जुन्याजाणत्या नगरसेवकांना त्यांना मार्गदर्शन करावे लागेल

नवे नगरसेवक घेणार ज्येष्ठांचे मार्गदर्शन
राजीव वडगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमेश्वर : मालेगाव शहराच्या पश्चिम भागात शिवसेना व भाजपाने जोरदार मुसंडी मारली असली, तरी त्यांचे १६ विजयी उमेदवार नवखे असल्याने जुन्याजाणत्या नगरसेवकांना त्यांना मार्गदर्शन करावे लागेल व तरच प्रभागाचे प्रश्न जलद गतीने सुटू शकतील. शिवसेनेचे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. यात कविता बच्छाव (प्रभाग १ अ), प्रतिभा पवार (१ क), पुष्पा राजेश गंगावणे (८ अ), आशाबाई अहिरे (१० अ), जिजाबाई बच्छाव (१० ब), जयप्रकाश पाटील (१० क), नीलेश अहेर (१० ड), कल्पना विनोद वाघ (११ ब) व नारायण शिंदे (२ ड) हे नऊ उमेदवार प्रथमच विजयी होऊन नगरसेवक झाले आहेत. यात नारायण शिंदे यांना जि. प. सदस्यपदाचा अनुभव आहे. उर्वरित सर्व नवीन चेहरे आहेत. शिवसेनेचे जुनेजाणते सखाराम घोडके आठव्यांदा सभागृहात दिसणार आहेत, तर राजाराम जाधव व अॅड. ज्योती भोसले २००२ मध्ये विजयी झाले होते. जिजाबाई दिलीप पवार नगरपालिका असताना उपनगराध्यक्ष होत्या. या सर्वांना नगरपालिका कामकाजाचा अनुभव आहे. त्यांना आपल्या नवीन सहकाऱ्यांना कामकाजाबाबत मार्गदर्शन करावे लागेल. भारतीय जनता पार्टीचे पश्चिम भागात नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात विजय देवरे (१ ड), छायाबाई शिंदे (२ ब), दीपाली विवेक वारुळे (८ ब), तुळसाबाई साबणे (९ अ), संजय काळे (९ ब), भरत बागुल (११ अ) व सुवर्णा राजेंद्र शेलार (११ क) हे सात उमेदवार नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच विजयी झाले आहेत. सुनील गायकवाड यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली, तर मदन गायकवाड सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. गायकवाड बंधूंना आपल्या सात नव्या नगरसेवकांना मार्गदर्शन करून आपल्या प्रभागातील कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
एकूणच संगमेश्वर, कॅम्प, सोयगाव, भायगाव, कलेक्टरपट्टा यातील नागरी समस्यांसाठी ज्येष्ठ नगरसेवक सखाराम घोडके, सुनील गायकवाड आदींवर मोठी जबाबदारी असून, या नव्या प्रतिनिधींना कामकाजात मार्गदर्शन करून सक्रिय करावे लागेल. महापालिकेच्या ढिम्म प्रशासनाला सक्रिय करण्यासाठी पश्चिम भागातील १६ नव्या चेहऱ्यांना ज्येष्ठ नगरसेवकांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल तरच आपआपल्या प्रभागातील नागरी समस्या मार्गी लागू शकतील.