मनपा अधिकाऱ्यांचा ‘खडा पहारा’
By Admin | Updated: August 7, 2015 23:00 IST2015-08-07T22:57:51+5:302015-08-07T23:00:15+5:30
पर्वणीकाळासाठी नियुक्ती : सेक्टरनिहाय कर्मचाऱ्यांचीही लागणार ड्यूटी

मनपा अधिकाऱ्यांचा ‘खडा पहारा’
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तीनही पर्वणीकाळात महापालिकेतील मुख्यालयाचे कामकाज जवळपास ठप्प होणार असून, नऊ दिवसांसाठी सर्व विभागप्रमुखांसह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा ‘खडा पहारा’ रामकुंड, गोदाघाट परिसरासह भाविकमार्ग, साधुग्राम, शाहीमार्गावर राहणार आहे. पर्वणीकाळात भाविकांसह साधूंना देण्यात येणाऱ्या सुविधा पुरविण्यासाठी सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांसंबंधीचे नियोजन प्रशासनाने केले असून, त्यासाठी दि. १० व १७ आॅगस्ट रोजी कालिदास कलामंदिरात सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात आले आहे.
दि. २९ आॅगस्ट, दि. १३ सप्टेंबर रोजी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे, तर दि. १८ सप्टेंबरला नाशिक आणि २५ सप्टेंबरला त्र्यंबकेश्वर याठिकाणी शाही पर्वणी आहे. पर्वणीकाळात लाखोने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता त्यांना योग्य त्या सुविधा पुरविणे तसेच इतर कामांबाबत महापालिका प्रशासनानेही नियोजन केले असून, त्यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांसह सुमारे ६५० कर्मचाऱ्यांची सेक्टरनिहाय नियुक्ती केली जाणार आहे.
प्रशासनाने केलेल्या प्राथमिक नियोजनानुसार धुळेकडून येणाऱ्या भाविक मार्गासाठी उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, औरंगाबादरोडकडील भाविक- मार्गासाठी सहायक आयुक्त चेतना केरुरे, पुणेरोडकडील भाविकमार्गासाठी मुख्य लेखाधिकारी राजेश लांडे, मुंबईकडील भाविकमार्गासाठी उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर, त्र्यंबक व गंगापूररोडकडील भाविकमार्गासाठी उपआयुक्त दत्तात्रेय गोतिसे, पेठरोडकडील भाविकमार्गासाठी सहायक आयुक्त वसुधा कुरणावळ, साधुग्रामसाठी उपअभियंता बी. यू. मोरे, दिंडोरीरोडकडील भाविकमार्गासाठी मुख्यलेखापरीक्षक जी. एन. देशमुख, शाही मिरवणूक व परतीच्या मार्गाकरिता उपआयुक्त रोहिदास बहिरम, रामकुंड व घाट परिसरासाठी नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागुल, आपत्कालीन स्थितीसाठी उपआयुक्त विजय पगार, आर. पी. विद्यालयात कार्यकारी अभियंता एस. व्ही. घुगे, शिवाजी स्टेडियममध्ये विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, नवीन शाही मार्गावर सहायक आयुक्त नितीन नेर, टाकळीरोडवर क्रीडा अधिकारी यशवंत ओगले, एसटी डेपो तपोवनाकरिता विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी, डिस्टलरी क्वॉर्टरसाठी उपमुख्य लेखापरीक्षक श्रीमती प्रतिभा मोरे, दिंडोरीरोडवर प्रभारी विभागीय अधिकारी एम. डी. पगारे आणि बागवानपुरात सहायक आयुक्त एस. डी. ठाकरे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मात्र, अंतिम नियोजन आणि नियुक्तीसंबंधी माहिती दि. १० आॅगस्ट रोजी होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळीच दिली जाणार आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या पर्वणीकाळातील नऊ दिवसांसाठी राहणार आहे. (प्रतिनिधी)