विकास दराचा आलेख ‘अच्छे दिन’चे द्योतक
By Admin | Updated: June 8, 2016 23:06 IST2016-06-08T22:55:27+5:302016-06-08T23:06:27+5:30
सुभाष भामरे : सटाणा येथे विविध कार्यक्रम

विकास दराचा आलेख ‘अच्छे दिन’चे द्योतक
सटाणा : आपल्या देशाचा विकास दर गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजेच यूपीए सरकारच्या काळात चार टक्के होता. या दोन वर्षांच्या मोदी सरकारच्या काळात हा विकास दर ७.६५ टक्क्यांवर आला आहे. हा विकासाचा वाढता आलेखच खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’चे द्योतक असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
केंद्रातील एनडीए सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने सटाणा शहरात खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर असोसिएशन, वकील संघ, व्यापारी संघटना, हमाल मापारी व महायुतीच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी जनधन विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अशा विविध महत्त्वाकांक्षी योजनांबद्दल माहिती दिली.
परदेशी कंपन्यांनी ६५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्याचा बेकारी दूर होण्यास मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. युरिया, इथेनॉल, कोळसा आणि विजेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट करून इंदूर-धुळे-मनमाड रेल्वे मार्गासाठी खास बाब म्हणून विशेष आर्थिक तरतूद केल्यामुळे या कामाला गती मिळून आपल्या भागाचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे खासदार डॉ. भामरे यांनी
सांगितले. सटाणा बायपास रस्त्याबाबत ते म्हणाले की, पश्चिमेकडून होणाऱ्या बायपाससाठी मुंजवाड व तरसाळीच्या १२० शेतकऱ्यांनी हरकती घेतल्यामुळे आता दुसरा पर्याय समोर आला असून, वनोली ते चौंधाणे हा रस्ता केंद्राच्या राखीव निधीमधून सात मीटर रुंद करून हा मार्ग राज्यमार्ग १९ ला जोडून मुंजवाड,ङ्क्तदऱ्हाणेवरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. या बायपासबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही खासदार डॉ. भामरे यांनी संबधित यंत्रणेला दिल्या. यावेळी रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, संजय भामरे, मुन्ना सोनवणे, बिंदू शर्मा, अण्णा अहिरे, नीलेश पाकळे, राजेंद्र देवरे, जिभाऊ मोरकर, राहुल सोनवणे आदि उपस्थित होते.
(वार्ताहर)