थंडीच्या प्रमाणात हळूहळू वाढ
By Admin | Updated: November 18, 2015 00:05 IST2015-11-18T00:04:15+5:302015-11-18T00:05:10+5:30
हवामान कोरडे; पारा १३.४ अंशांवर

थंडीच्या प्रमाणात हळूहळू वाढ
नाशिक : शहरात आठवडाभरापासून थंडीची तीव्रता कायम असून, किमान तपमान १३ अंशांवर स्थिरावले आहे. पुढील दोन-तीन दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दिवाळीनंतर थंडीच्या प्रमाणात हळूहळू वाढ होत असून, शहर परिसरात पहाटे व रात्री गारवा जाणवत आहे. गेल्या शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस राज्यातील नीचांकी तपमान नाशिकमध्ये नोंदवले गेले. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाले होते; मात्र आठवडाभरापासून हवामान कोरडे राहिल्याने किमान तपमानात घट होत आहे. मंगळवारीही नाशिकचे किमान तपमान १३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. गेल्या १४ तारखेपासून तपमानाचा पारा १३ अंशांवर येऊन पोहोचला आहे. तपमान घटल्याने नागरिक ऊबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. नवनवीन जॅकेट्सना महिला-पुरुषांची पसंती लाभत आहे.दरम्यान, घसरलेल्या पाऱ्यामुळे शहरावर सकाळी धुक्याची दुलई पसरत आहे. ठिकठिकाणची मैदाने, जॉगिंग ट्रॅकवर सकाळी व सायंकाळी गर्दी वाढू लागली आहे. सुक्या मेव्याच्या विक्रीतही वाढ झाली आहे.