कांदा दरात वाढ होण्याच्या प्रतीक्षेत उत्पादक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:16 IST2021-08-23T04:16:56+5:302021-08-23T04:16:56+5:30
गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६९.४० क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ६०० कमाल रुपये १,९०२ ...

कांदा दरात वाढ होण्याच्या प्रतीक्षेत उत्पादक
गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६९.४० क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ६०० कमाल रुपये १,९०२ तर सर्वसाधारण रुपये १,७४५ प्रती क्विंटल राहिले. गेल्या आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चाळींमध्ये साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा खराब होऊ लागला असून त्याला वास येऊ लागला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात शेतकरी उन्हाळ कांद्याच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्षांप्रमाणे दक्षिण भारतात अधिकचा पाऊस होऊन कांद्याचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी असल्याने स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचा शेतकऱ्यांना अपेक्षित भाव अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप कांद्याच्या लागवडीला बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप पसंती दिलेली नाही. शिवाय बियाण्यांची कमतरता असल्याने किलोला ७०० ते १००० रुपये भावाने बियाणे खरेदी करावे लागले आहे.
पोळ्यानंतर कांद्याच्या लागवडीची वाढ शेतकऱ्यांकडून होण्याची शक्यता अधिक आहे. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात टप्प्याटप्प्याने उन्हाळ कांद्याच्या लागवडीसाठीच्या बियाण्यांसाठी रोपे टाकण्यास सुरुवात होईल. नोव्हेंबरमध्ये उन्हाळ कांद्याची लागवड केल्याने चांगली थंडी मिळते आणि अधिक उत्पादन मिळते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. जानेवारीत थंडी मिळत नसल्याने कांद्याचा आकार लहान राहतो, असेही शेतकरी सांगतात. दरम्यान, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, हरियाणा, उत्तर प्रदेश, तमिळनाडूमध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा खरीप कांद्याच्या
उत्पादनात ५० ते ६० हजार टनाने घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा पावसाने दडी मारली. त्यामुळे कांदा लागवडीचे गणित बिघडले आहे. पाऊस लांबल्याचा हा परिणाम असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रोपवाटिकेच्या घटलेल्या क्षेत्रामुळे अडीच हजार हेक्टरने लागवड कमी होणार आहे. सद्यस्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्या क्षेत्रावर आतापर्यंत खरीप कांद्याची लागवड झाली आहे.
देशात २०१९ मध्ये १४ लाख ३१ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली होती. त्यावेळी दोन कोटी ६० लाख ९१ हजार ३८० टन कांदा उत्पादन झाले होते. हेक्टरी १८.२३ टन उत्पादकता मिळाली होती. त्यावेळी राज्यातील शेतकऱ्यांनी सहा लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रातून एक कोटी सहा लाख ८३ हजार टन उत्पादन घेतले होते. राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी १७.२९ टन उत्पादकता मिळाली होती. कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात २०१९ मध्ये २३ हजार हेक्टरवर खरीप कांद्याची लागवड झाली होती. गेल्या वर्षी सहा हजार ३९४ हेक्टरवर रोपवाटिका तयार झाल्या होत्या आणि त्यातून खरीप कांद्याचे क्षेत्र २७ हजार हेक्टरवर पोहोचले होते. जिल्ह्यात खरीप कांद्याचे सर्वसाधारण क्षेत्र २० हजार ५८४ हेक्टर इतके आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सात हजार ४६९ हेक्टरवर खरीप कांद्याची लागवड झाली होती. सद्यस्थितीत हीच लागवड तीन हजार ६०९ हेक्टरपर्यंत झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात वरुणराजा हजेरी लावत असल्याने पोळ्यापर्यंत खरीप कांद्याखालील क्षेत्र आणखी २० हजार हेक्टरच्या पुढे पोहोचण्याची शक्यता कृषी विभागातर्फे वर्तवण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे आगर असलेल्या कळवण, देवळा, दिंडोरी, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर पट्ट्यात अद्याप खरीप कांद्याच्या लागवडीला वेग आलेला नाही. हा वेग वाढण्यातून २०१९ मधील क्षेत्राइतके यंदा खरीप कांद्याचे क्षेत्र होण्यास मदत होणार आहे.