गट आरक्षणाच्या आडाख्यांचे ‘इमले’ जोरात
By Admin | Updated: July 22, 2016 00:19 IST2016-07-22T00:14:17+5:302016-07-22T00:19:25+5:30
जिल्हा परिषद निवडणूक : तीन पंचवार्षिकच्या आरक्षणाची घेतली माहिती

गट आरक्षणाच्या आडाख्यांचे ‘इमले’ जोरात
नाशिक : जिल्हा परिषदेच्या गट व गणांचे आरक्षण व रचना करण्यासाठी प्रशासनाने प्रारंभ करताच जिल्हा परिषद सदस्यांमध्ये कोणते गट आरक्षित होणार आणि कोणते गट खुले होणार, याचे आडाखे बांधण्यात सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषदेच्या गट व गणांची पंचवार्षिक निवडणूक येत्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. २१ मार्च २०१७ पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करणे कायद्याने बंधनकारक आहे. मागील निवडणुकांचा अनुभव पाहता साधारणपणे जानेवारीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होऊन फेब्रुवारी १५ ते २० दरम्यान मतदान व मतमोजणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांचेही मतदान आणि मतमोजणी फेब्रुवारी २०१७ मध्ये होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत गट व गणांच्या आरक्षणाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
या चर्चेनुसार निफाड, सिन्नर व येवला तालुक्यातील दोन डझन जिल्हा परिषदेचे बहुतांश गट सर्वसाधारण किंवा इतर मागास प्रवर्गासाठी खुले होणार असल्याचा दावा केला आहे. तर कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यातील बहुतांश गट अनुसूचित जमाती तसेच अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव राहणार असल्याचा दावा करण्यात आला. येत्या आॅगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद गट व गणांच्या रचनेबाबत कार्यवाही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)